संसर्ग व्हायचा असता तर तो ‘तेव्हाच’ झाला असता! घाबरण्याचे कारण नसल्याची तज्ज्ञांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा कोणताही नवा व्हेरिएंट आल्यानंतर त्यावर ठोस उपाययोजना करता याव्यात यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण करणे गरजेचे आहे. मागील 2 वर्षांपासून हे सुरु आहे मात्र आता रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे 100 टक्के रुग्णांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचे ठरविले आहे. सोशल मीडियावर या नव्या व्हेरिएंट संदर्भात चुकीची आणि अर्धवट माहिती सामोर येत आहे. जर या व्हेरिएंटचा संसर्ग झपाट्याने होत असेल तर तो संसर्ग तेव्हाच झाला असता. यामुळे हिंदुस्थानच्या वातावरणात त्याची वाढ झालेली नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका मात्र काळजी घ्या असे आवाहन राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी केले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला ते मुलाखत देत होते.

ते म्हणाले की राज्यातील आलेख पाहता कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. मागच्या आठवड्यात केवळ 16 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे 20 टक्क्यांहून अधिक कोरोना केसेस कमी झाल्या आहेत. मात्र चीन, अमेरिका, ब्राझील, जपान याठिकाणी कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यात चीन अगदी शेजारी असल्यामुळे त्याची चिंता अधिक वाटते. बीएफ 7 हा वेगळा व्हेरिएंट नसून तो ओमायक्रॉनचाच भाग आहे. महाराष्ट्रात हा व्हेरिएंट नसला आढळला तरी गुजरात मध्ये तो जुलै आणि ऑक्टोबर मध्ये आढळला आहे. हिंदुस्थानात हा व्हेरिएंट काही महिन्यांपूर्वी आढळून देखील त्याची वाढ झालेली नाही त्यामुळे या व्हेरिएंटची मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी शक्यता वाटत नाही. मात्र आपण हलगर्जीपणा न करता काळजी घेत आहोत. आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री यासंदर्भात बैठका घेत आहेत. केंद्र सरकार देखील आज टास्क फोर्सची बैठक घेत आहे. त्यासाठी आता १०० टक्के कोरोना रुग्णांचं जनुकीय क्रमनिर्धारण नियमितपणे सुरु ठेवणे गरजेचे आहे.

चीनबद्दल कोणतीच गोष्ट खात्रीपूर्वक बोलू शकत नाही. कारण तेथील माहिती ही पारदर्शकपणे जगापुढे येत नाही. चीनमध्ये कोरोनाची वेगळी लस देण्यात आली आहे. त्यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील वेगळ्या होत्या. माहितीची सत्यता समोर येत नसल्यामुळे आपण चीन बद्दल काहीच सांगू शकत नाही. प्रत्येक देशातील लोकांची रोगप्रतिकारक शक्ती व तेथील वातावरणानुसार एखादा व्हेरिएंट वाढतो किंवा कमी होतो. हिंदुस्थानात असे अनेक व्हेरिएंट आले मात्र ते वाढले नाहीत. त्यामुळे एखाद्या देशाचे वातावरण या गोष्टीसाठी मोठ्याप्रमाणात जबादार असते. असे ते म्हणाले

50 वर्षांच्या पुढील व्यक्ती तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, कँसर, किडनीचे आजार असणाऱ्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच लसीकरण पूर्ण करणे देखील गरजेचे आहे. या दोन गोष्टी पूर्ण झाल्यास इतर चिंता करण्याची गरज नाही. असे ते म्हणाले.