मुंबईत कोरोनाला लगाम; दिवसभरात 7 हजार 895 कोरोना रुग्ण, सर्वाधिक 21 हजार कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेले काही दिवस 20 हजारपर्यंत पोहोचलेली कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यात मुंबई महापालिकेला यश आले असून आज दिवसभरात 7 हजार 895 कोरोना रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज 11 जणांचा मृत्यू झाला असून आज एकाच दिवसात सर्वाधिक 21 हजार 25 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत डिसेंबरपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत जाऊन 20 हजारांवर पोहोचला होता. मात्र गेल्या पाच दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून आज महापालिकेकडून 57 हजार 534 चाचण्या करण्यात आल्या. यात 7 हजार 895 कोरोना रुग्ण सापडले. यात 6 हजार 632 रुग्ण (84 टक्के) हे लक्षणे नसलेले आहेत. यातील 688 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 92 जण ऑक्सिजनवर आहेत. मुंबईत एकूण केवळ 15 टक्के रुग्ण हे रुग्णालयात आहेत. दरम्यान, राज्यात दिवसभरात 41 हजार 327 रुग्ण सापडले, तर 29 जणांचा मृत्यू झाला.

ओमायक्रोनचे 15 नवीन रुग्ण 

मुंबईत ओमायक्रोन विषाणूने पुन्हा घुसखोरी केली असून आज 15 नवीन ओमायक्रोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईत ओमायक्रोनबाधित रुग्णांची संख्या 334 वर पोहोचली आहे. दरम्यान, ओमायक्रोन रुग्णांचा अहवाल आज जाहीर करण्यात आला. आज 15 नवीन रुग्ण आढळल्याने ओमायक्रोन रुग्णांची संख्या 334 वर पोहोचली आहे, तर 334 पैकी 309 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दुबईसह यूएईतून आलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआरची गरज नाही 

दुबईसह यूएईतून आलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी आणि सात दिवस क्वारंटाइनची अट शिथिल करण्यात आली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने आज परिपत्रक जारी केले असून उद्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. याआधी यूएईमधील दुबई देशातून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आले होते.