कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूला लगाम, राज्यात आठवड्याभरात दुसऱ्यांदा एकही मृत्यू नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यात कोरोना नियंत्रणात असला तरी कोरोनामुळे दरदिवशी रुग्णांचे मृत्यू होत होते. मात्र, आता मुंबईसह राज्यातही कोरोनामुळे होणाऱया मृत्यूला लगाम बसला असून आज दिवसभरात मुंबईसह राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. गेल्या सोमवारीही राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. दरम्यान, राज्यात आज 455 रुग्ण सापडले तर 356 जण कोरोनामुक्त झाले. राज्यात सध्या 2 हजार 366 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत आज दिवसभरात 172 रुग्ण सापडले. यापैकी 166 जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. 6 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर दोघा जणांना ऑक्सिजन बेड देण्यात आले. दिवसभरात 102 जण कोरोनामुक्त झाले. मुंबईत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 98 टक्के इतके जास्त आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होऊन ती 862 वर पोहोचली आहे.

रुग्णदुपटीच्या कालावधी 8 हजार 341 दिवसांवर

मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असून रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला आहे. हा कालावधी 8 हजार 341 दिवसांवर पोहोचला असून त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र मुंबईत अजूनही कोरोना रुग्ण सापडत असून आज दिवसभरात 172 रुग्ण सापडले. सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

3 ऑक्टोबर – 180 रुग्ण – एकही मृत्यू नाही
9 ऑक्टोबर – 455 रुग्ण – एकही मृत्यू नाही