
कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी गोवा सरकारकडून रविवारी मध्यरात्रीपासून सर्व शैक्षणिक संस्था, जिम, स्विमिंग पूल, सिनेमा थिएटर, कॅसिनो इत्यादी 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद प्रमोद सावंत यांनी दिली. कोरोनावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, मुख्य सचिव परिमल राय, आरोग्य सचिव नीला मोहनन यांच्या बरोबरच शिक्षण, गोवा विद्यापीठ, गोवा मेडिकल कॉलेज, रेल्वे, मुरगाव पोर्ट ट्रस्ट, पर्यटक खात्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकी नंतर माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे सर्व खबरदारी घेतली जात आहे. विमानतळ, मुरगाव पोर्ट ट्रस्ट आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तपासणी करण्यासाठी थर्मल स्कॅनर बसवले जाणार आहेत.त्यांची खरेदी त्वरित केली जाणार आहे. सर्व शैक्षणिक संस्था 31 मार्च पर्यंत बंद ठेवल्या जाणार असल्या तरी दहावी,बारावीसह इतर इयत्ताच्या परीक्षा नियोजित वेळा पत्रकाप्रमाणे होणार आहेत.
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सॅनिटायझर तसेच कर्मचाऱ्यांना मास्क पुरवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत देतानाच शिमगोत्सव आयोजनाबाबतचा निर्णय घेण्याची स्थानिक समित्यांना मुभा राहिल असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्वे जाहिर केली जाणार असून बंद दारा आड होणारे गर्दी जमेल असे कार्यक्रम शक्यतो आयोजित करू नये असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणी मास्क आणि सॅनिटायझर यांचा काळाबाजार करू नये असे स्पष्ट करत 31 मार्च रोजी पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.





























































