Corona ला हलक्यात घेऊ नका, तीन महिन्यानंतर रुग्णांचा आकडा चार हजार पार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा धोका कमी झाल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले होते. परंतु या जीवघेण्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आलेख खाली जात होता, मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढ वेगाने होण्यास सुरुवात झाली आहे. देशात तीन महिन्यामध्ये पहिल्यांदाच रुग्णांचा आकडा चार हजार पार पोहाचल्याने चिंता वाढली आहे.

देशात गेल्या 24 तासांमध्ये 4 हजार 41 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र, केरळ आणि दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोना वेगाने पसरत आहे. गुरुवारच्या तुलनेमध्ये शुक्रवारी तब्बल 1668 वाढीव रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 20 हजार पार पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या 21 हजार 177 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात देशात 10 मृत्यूंची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 5 लाख 24 हजार 651 वर पोहोचली आहे, तर सक्रमित रुग्णांचा आकडा 4 कोटी 31 लाख 68 हजार 585 झाला आहे.

गुरुवारीही कोरोना रुग्णांमध्ये तब्बल 35.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. काल 3712 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यातील बहुतांश रुग्ण हे केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा आणि कर्नाटक या पाच राज्यांमधील आहेत. जवळपास 80 टक्के रुग्ण या पाच राज्यातील आहे.

मुंबईत रुग्णसंख्या वाढतेय

मुंबईत एप्रिलमध्ये कोरोना पूर्ण आटोक्यात आला होता. दैनंदिन रुग्णसंख्या केवळ 35 इतकी खाली आली होती. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 1 मे रोजी 628 असणारी सक्रिय रुग्णसंख्या पाच पटींनी वाढून 1 जून रोजी 2 हजार 970 पर्यंत वाढली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 92 पर्यंत नोंद होणारी दैनंदिन रुग्णसंख्या आता थेट सातशेच्या घरात गेली आहे. यातच पावसाळा सुरू होत असल्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याचा धोका असल्याने पालिकेने चाचण्या वाढवून उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत सद्यस्थितीत 7 ते 10 हजारांपर्यंत चाचण्या होत असताना पॉझिटिव्हिटी रेट 9 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.