
वरळी कोळीवाडा परिसरात कोरोना संशयित रुग्ण आढळल्यामुळे हा संपूर्ण परिसर पालिकेने पोलिसांच्या मदतीने सील केला आहे. यानंतर या संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, या परिसरातील रहिवाशांनी घराबाहेर फिरू नये, गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत सुरू असलेल्या तपासणीत आता झोपडपट्टी भागातही ‘कोरोना’ने शिरकाव केला आहे. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये झोपडपट्टी भागात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची संख्या 99 झाली आहे तर, तब्बल 283 कोरोना संशयित आढळले आहेत. यामध्ये झोपडपट्टी भागात आढळलेल्या कोरोना संशयितांमुळे मुंबईच्या काळजीत भर पडली आहे. वरळी कोळीवाडा परिसरातही कोरोना संशयित आढळल्याने पालिकेने आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये परिसर सील करण्यात आला असून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. रस्ते, गाड्या आणि संपूर्ण झोपडपट्टीचे निर्जंतुकीकरण सुरू असल्याची माहिती स्थानिक नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी दिली. नागरिकांनी गर्दी करू नये, घाबरू नये, पण काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. आज सकाळी संपूर्ण यंत्रणा, मुंबई पोलीस ख्यात्याचे प्रमुख अधिकारी ए.सी.पी. गावकर वरिष्ठ पोलीस अधिकारी शेळके, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपविभागप्रमुख हरीश वरळीकर, वॉर्ड ऑफिसर उघडे, डॉक्टर गोल्लार प्रमुख मेडिकल अधिकारी, जीं /दक्षिण विभागाचे कीटक नाशक विभागाचे अधिकारी आणि त्यांचे सहकारी , पोलीस खात्याचे अधिकारी त्यांची संपूर्ण टीम यांच्या सोबत पुढील कार्यवाही आणि आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचेही नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी सांगितले.




























































