
विवाह सोहळा प्रामुख्याने दोन कुटुंबामध्ये संपन्न हात असला तरी त्या माध्यमातून हजारो लोकांच्या हाताला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे काम मिळते. मात्र सध्या कोरोना महामारीमुळे लग्नसोहळ्यांवर बंद असल्याने लग्नकार्याशी संबंधित उद्योगांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याची दखल घेत राज्य सरकारने मंगल कार्यालयांसाठी नियमावली तयार करावी अशी मागणी बॉम्बे कॅटरर्स असोसिएशनने केली आहे. नियमाचे पालन करून मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यांना परवानगी दिल्यास लग्नकार्याशी संबंधित उद्योगही टिकून राहतील असे स्पष्ट केले आहे.
राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून विवाह सोहळ्यांवर बंदी असल्याने गेल्या वर्षभरात एका पैशाचाही व्यवसाय झालेला नाही. त्यामुळे लग्नकार्याशी संबंधित उद्योग पंगू झाला असल्याचे बॉम्बे कॅटरर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश चंदाराणा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या उद्योगाला दिलासा देण्यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलावीत अशी प्रत्येकाची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. विवाह सोहळा हा केवळ उत्सव नसून तो एक मोठय़ा प्रमाणात रोजगार देणारा उद्योग आहे. या उद्योगामुळे महिलांना जास्त रोजगार मिळत असल्याचे असोसिएशनचे पदाधिकारी सतीश कामत यांनी सांगितले. विवाह सोहळ्यांमुळे कोरोनाचा मोठय़ा प्रमाणात फैलाव होऊ शकते, हा एक गैरसमज असल्याचे मत असोसिएशनचे प्रवक्ते ललित जैन यांनी व्यक्त केले. आज रेस्टॉरंटला पन्नास टक्के, हॉटेल्स, लग्नसमारंभ आयोजित केलेल्या रिसॉर्टला शंभर टक्के क्षमतेने काम करण्याची परावानगी आहे, पर्यटन व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालवण्याची परवानगी आहे याकडे सुनील वेगुर्लेकर यांनी लक्ष वेधले.
मंगल कार्यालयाच्या जागेच्या प्रमाणात पाहुण्यांची संख्या निश्चित करावी
सामान्य परिस्थितीमध्ये कोणत्याही ठिकाणी एक व्यक्ती साधारणपणे आठ-दहा चौरस फूट जागा व्यापते. मंगल कार्यलयांबाबत नियमावली बनवताना सरकारने ही मर्यादा 20-25 चौरस फुटांपर्यंत वाढवावी. तसेच मंगल कार्यालयाच्या एकूण जागेचा विचार करून इतर उद्योगांप्रमाणे पाहुण्यांची संख्या निश्चित करावी असे सुनील वेंगुर्लेकर यांनी असोसिएशनच्या वतीने स्पष्ट केले आहे.



























































