राज्याला दिलासा- कोरोनाची रुग्णसंख्या झाली कमी, बरे होणाऱया रुग्णांचे प्रमाण जास्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असल्याचे समाधानकारक चित्र राज्यात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्या वाढत असून रविवारी तब्बल 29 हजार 177 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आज एकूण 26 हजार 672 नव्या रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात रविवारी 594 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 1.59 टक्के एवढा आहे. दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण 51 लाख 40 हजार 272 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.12 टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,30,13,516 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,79,897 (16.9टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 26,96,306 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर 21,771 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात कालपर्यंत 2 कोटी 07 लाख 52 हजार 87 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.  तर शनिवारी 1,22,140 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.