
पंढरपूर येथील स्वेरी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला कोरोना झाला असल्याची बोगस पोष्ट व्हॉटसअपवर पसरविणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाकलेली बोगस पोष्ट खरी वाटावी यासाठी अज्ञात व्यक्तीने एका वृत्तवाहिनीच्या ब्रेकिंग बातमीचा संदर्भ जोडला आहे. पंढरपूर शहरातील काही व्यक्तींच्या मोबाईल व्हॉटसअपवर सदर विषयाच्या अनुषंगाने शनिवारी दिवसभर पोस्ट फिरत होती.
या बातमीने स्वेरीच्या पालकांमध्ये घबराट पसरली प्रत्येक पालक संस्थेकडे विचारणा करू लागल्याने ही बाब संस्थेच्या निदर्शनास आली. तेव्हा बातमीची शहानिशा केल्यानंतर ही पोस्ट फेक असल्याचे लक्षात आले. अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणाने महाविद्यालय आणि समाजात घबराट पसरावी या उद्देशाने हा प्रकार केल्याने संस्थेचे प्रा. मुकुंद मारुती पवार यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस सदर व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत.


























































