
कोरोना संसर्ग रुग्णसंख्या कमी होत असली तरी देशात तिसरी लाट अटळ आहे. पुढच्याच महिन्यात ऑगस्टच्या दुसऱया पंधरवडय़ापासून कोरोनाची तिसरी लाट सुरू होऊन सप्टेंबरमध्ये स्थिती बिकट होईल, असे स्टेट बँकेने (एसबीआय) आपल्या अहवालात म्हटले आहे. स्टेट बँकेच्या अहवालामुळे देशभरात पुन्हा धास्ती वाढली आहे.
कोरोनाच्या तिसऱया लाटेबाबत तज्ञांमध्ये मतमतांतरे असले तरी, ‘अनलॉक’नंतर ज्या बेफिकीरीने लोक घराबाहेर पडत आहेत ते पाहता तिसरी लाट अटळ असल्याचे संकेत अनेकांनी दिले आहेत. युरोपातही दुसरी लाट ओसरल्यानंतर कोरोनाची तिसरी लाट आली. त्यामुळे हिंदुस्थानातही तिसऱया लाटेची शक्यता यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) व्यक्त केली आहे. स्टेट बँकेने यापूर्वी 7 मेपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होईल, असे सांगितले होते. त्यानुसार एप्रिलमध्ये दुसरी लाट सुरू झाली आणि मे महिन्यात उच्चांक गाठला होता. त्यामुळे स्टेट बँकेने तिसऱया लाटेबाबत अंदाज व्यक्त केल्याने धास्ती वाढली आहे.
24 तासांत 39,796 नवे रुग्ण; 723 मृत्यू
देशभरात गेल्या 24 तासांत 39,796 नवीन रुग्ण आढळले आणि 723 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. गेल्या 88 दिवसांत ही सर्वात कमी मृतांची संख्या आहे.
आतापर्यंत कोरोना मृतांची संख्या 4 लाख 2 हजार 728 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.11 टक्क्यांवर गेली आहे.
98 दिवस तिसरी लाट राहणार
- ऑगस्टच्या दुसऱया पंधरवडय़ापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात होईल. सप्टेंबरमध्ये तिसऱया लाटेचा उच्चांक गाठला जाईल. तिसऱया लाटेचा प्रभाव 98 दिवस राहील, असे स्टेट बँकेच्या अहवालात म्हटले आहे.
- दुसऱया लाटेपेक्षा तिसऱया लाटेत संसर्ग अधिक वेगाने होईल. दुप्पट किंवा 1.7 टक्के पटीने अधिक होईल. मात्र लसीकरणाचा फायदा लोकांना होईल. संसर्ग रुग्णांची संख्या वाढली तरी मृतांचे प्रमाण दुसऱया लाटेपेक्षा कमी असेल.



























































