धारावीत लसीकरणाचा टक्का वाढणार; खासगी डॉक्टर करणार समुपदेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावीत पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकांनी लसीकरणाकडे वळावे आणि लसीकरणाला गती मिळावी यासाठी त्यांचे मन वळवण्यासाठी आता खासगी डॉक्टर समुपदेशन करणार आहेत. या संदर्भात धारावीतील डॉक्टरांबरोबर पालिका अधिकाऱयांची गुरुवारी एक बैठक झाली. दरम्यान, धारावीत दरदिवशी सरासरी 1200 जणांचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती जी-उत्तरचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर राज्य सरकार आणि पालिकेने विविध मोहिमा राबवून कोरोनाला नियंत्रणात आणले, मात्र फेब्रुवारी 2021 पासून मुंबईत पुन्हा कोरोना फैलावू लागल्याने धारावीतही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. दादर आणि माहीममध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. त्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असून लसीकरणाचे महत्त्व लोकांना पटवण्यासाठी धारावी-माहीम मेडिकल प्रॅक्टिशनर्सच्या 350 खासगी डॉक्टरांबरोबर सहाय्यक आयुक्तांनी बैठक घेऊन लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्याचे आवाहन केले. त्यानुसार हे खासगी डॉक्टर पालिकेला सर्वोतोपरी मदत करून लसीकरणाबाबत लोकांचे समुपदेशन करणार आहेत. त्यामुळे धारावीत लसीकरणाचा टक्का वाढणार आहे.

एसआरएच्या इमारतीत नवे कोरोना सेंटर

धारावीत आज 73 रुग्ण सापडले असून आतापर्यंत 694 सक्रिय रुग्ण आहेत, दादरमध्ये 100 रुग्ण सापडले असून 1020 सक्रिय रुग्ण आहेत तर माहीममध्ये 120 रुग्ण सापडले असून 1183 सक्रिय रुग्ण आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोना सेंटर्सची संख्या वाढवण्यात येणार असून वनमाळी, वनिता समाज या मोठय़ा क्वारंटाइन सेंटर्ससह आता नव्याने बांधण्यात आलेली एसआरएची सात मजली इमारत ताब्यात घेण्यात आली आहे, अशी माहिती किरण दिघावकर यांनी दिली.