26 मेपर्यंतच टेन्शन;स्टेट बँकेचा थोडा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाने संपूर्ण देशाला पुन्हा चिंतेत लोटले असताना स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलासादायक अहवाल दिला आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट 15 फेब्रुवारीला सुरू झाली असून ती 100 दिवसांतच म्हणजे 26 मेपर्यंत संपेल, असा निष्कर्ष बँकेने काढला आहे. एप्रिलच्या मध्यावर रुग्णांची संख्या एकाएकी वाढू शकेल. परंतु, हिंदुस्थान आधीपेक्षा चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळेल, असे बँकेने म्हटले आहे.

स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक संशोधन विभागाने कोरोना संसर्गाबाबत गुरुवारी आपला 28 पानी अहवाल जारी केला. कोरोना रुग्णवाढीचा 23 मार्चपर्यंतचा ट्रेंड विचारात घेता देशात दुसऱ्या लाटेत 25 लाख लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते. 15 जिह्यांमध्ये (विशेषतः शहरी) रुग्ण वाढलेत, ग्रामीण भागात कोरोना संसर्ग जवळपास स्थिर आहे. सध्याच्या घडीला व्यापक लसीकरण हाच कोरोना लढयातील सर्वात प्रभावी उपाय आहे. या लसीकरण मोहिमेत इतर देशांच्या तुलनेत हिंदुस्थान आघाडीवर आहे. देशात आतापर्यंत 5.3 कोटींहून अधिक लोकांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. इतर देशांत मात्र कोरोनाची दुसरी लाट भयानक वेगाने फैलावली आहे, असे स्टेट बँकेने अहवालात नमूद केले आहे.

अहवालात काय म्हटलेय?

  • व्यापक लसीकरणाच्या जोरावर हिंदुस्थान कोरोनाचा संसर्ग रोखण्यात भक्कम स्थितीत आहे. लसीकरणाला गती देणे हाच कोरोनापासून वाचण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे.
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने इतर देशांची वाताहात उडाली आहे. मात्र लसींची उपलब्धता व लसीकरण यामुळे हिंदुस्थान इतर देशांच्या तुलनेत कोरोनाची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळेल.
  • देशात ज्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा वाढवल्या आहेत, त्याचा विचार करता सध्याची प्रतिदिन 34 लाख लोकांना लस टोचण्याची क्षमता प्रतिदिन 1 कोटींपर्यंत वाढेल.

…तर 1 वर्ष 9 महिन्यांतच सर्व नागरिकांना लस मिळेल

  • कोरोना लस घेण्यासाठी अधिकाधिक नागरिक पुढे आले व सध्याची लस घेणाऱयांची संख्या प्रतिदिन 40 ते 45 लाखांवर गेली तर देशातील सर्व लोकसंख्येला पुढील 1 वर्ष 9 महिन्यांतच लस टोचण्यात यश मिळेल. तसेच 45 वर्षांवरील लोकसंख्येचे लसीकरण अवघ्या चार महिन्यांत पूर्ण होईल, अशी शक्यता स्टेट बँकेने वर्तवली आहे.
  • स्थानिक पातळीवरील निर्बंध आणि लॉकडाऊन विषाणूचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरले आहेत. अशा परिस्थितीत लसीकरण मोहिमेला गती देणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. लसीकरणाची गती वाढवूनच आपण कोरोनाविरोधातील लढा जिंकू.