अन्य राज्यांमधून येणाऱया रेल्वे प्रवाशांना आरटीपीसीआर बंधनकारक

कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱया वाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोवा, केरळ, राजस्थान, गुजरात आदी राज्यांतून येणाऱया रेल्वे प्रवाशांना आता कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केल्याशिवाय महाराष्ट्रात एण्ट्री मिळणार नाही. याविषयीचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी रविवारी रात्री जारी केले आहेत. अन्य राज्यांतून येणाऱया प्रवाशांना 48 तासांपूर्वीची नकारात्मक करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार या राज्यातून येणाऱया रेल्वे गाडय़ांची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणास देण्याच्या सूचना रेल्वेला देण्यात आल्या आहे.

केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंड ही राज्ये करोनाच्या बाबतीत संवेदनशील प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे या राज्यातून येणाऱया प्रवाशांना केवळ आरक्षित तिकिटावरच प्रवास करता येईल. अनारक्षित किंवा वेटिंगवर असलेल्या प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. या राज्यातून येणाऱया प्रवाशांची 48 तासांपूर्वीची आरटीपीसीआर करोना चाचणी नकारात्मक असली पाहिजे.

प्रत्येक प्रवाशाची चाचणी करून लक्षणे नसलेल्या प्रवाशालाच गाडीत चढू द्यावे. प्रवासा दरम्यान सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल. ज्या प्रदेशातून रेल्वे राज्यात प्रवेश करेल, त्या रेल्वेतील प्रवाशांची यादी ते कोणत्या स्थानकावर उतरणार याचा तपशील चार तास अगोदर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास कळविणे बंधनकारक राहील. राज्यात ज्या स्थानकावर हे प्रवाशी उतरतील तेव्हा त्यांच्याकडे कोरोना चाचणी अहवाल नसल्यास लगेच चाचणी करावी. त्यात नकारार्थी अहवाल येणाऱयांना 15 दिवस गृह अलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या