घाबरू नका, मुंबईत कोरोनाचा एकही रुग्ण नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात गेल्या दोन दिवसांत रक्त चाचणी झालेल्या 15 ‘कोरोना’ संशयितांचे ब्लड रिपोर्ट ‘कोरोना निगेटिव्ह’ आले आहेत. तर सहा जणांवर उपचार सुरू असून त्यांचे ब्लड रिपोर्ट बुधवारी सकाळपर्यंत येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. दरम्यान, मुंबईत ‘कोरोना’चा एकही रुग्ण आढळला नसल्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जगभरात खळबळ माजवणाऱया जीवघेण्या ‘कोरोना’ व्हायरसने आता हिंदुस्थानमध्येही शिरकाव केल्याने पालिकेच्या माध्यमातून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. यामध्ये विमानतळाकर पालिका, राज्य सरकार आणि विमानतळ प्राधिकरणाच्या डॉक्टरांच्या टीमकडून 24 तास थर्मल स्कॅनिंग आणि आवश्यक तपासणी सुरू आहे. या तपासणीत गेल्या दोन दिवसांत आढळलेल्या 15 संशयितांचे ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या रुग्णांची रक्त चाचणी कस्तुरबातच सुरू करण्यात आलेल्या रक्त चाचणी विभागात करण्यात आली.

…तर डॉक्टरांशी संपर्क साधा

विषाणू प्रजातीमधील ‘कोरोना’ची लागण झाल्यास सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनालाही त्रास होतो. न्यूमोनियासारख्या या आजारात मूत्रपिंडही निकामी होऊ शकते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा आजारांत पाच दिवस औषधोपचार करूनही आराम पडला नाही तर कस्तुरबा रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उपचारासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज

पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात 28 बेडची व्यवस्था असून ‘कोरोना’ रक्तचाचणीही करण्यात येत आहे. शिवाय आपत्कालीन स्थितीसाठी पालिकेच्या महत्त्काच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये

व्यवस्था करण्यासाठी आराखडा तयार ठेवला आहे.

याचबरोबर ‘कोरोना’चा मुकाबला करण्यासाठी पालिकेने राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर या रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष सज्ज ठेवले असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.