
दुबई आणि लंडनच्या प्रवाशांमुळे हिंदुस्थानात कोरोनाचा शिरकाव झाला. पुढे गुजरात, कर्नाटक, केरळ, राजस्थान, जम्मू -कश्मीर आणि महाराष्ट्र या राज्यांतील कोरोनाग्रस्तांमुळे विषाणूचा स्थानिक पातळीवर मोठय़ा प्रमाणावर फैलाक झाला, अशी माहिती आयआयटी मंडीच्या सर्वेक्षणात समोर आली आहे. या सर्वेक्षणातील निष्कर्ष ‘जर्नल ऑफ ट्रव्हल मेडिसिन’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. तामीळनाडू, दिल्ली आणि आंध्र प्रदेशातील रुग्णांमुळे तुलनेत कमी संसर्ग पसरल्याचे म्हटले आहे.
कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच जानेवारी ते एप्रिलदरम्यान पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा आयआयटी मंडीतील अभ्यासकांच्या पथकाने अभ्यास केला. संबंधित रुग्णांनी हिंदुस्थानात येण्याआधी कुठे कुठे प्रवास केला याची माहिती गोळा करण्यात आली. त्या माहितीत बहुतांश रुग्ण हे दुबई व लंडनमधून प्रवास करून आल्याचे आढळले. त्या प्रवाशांमुळेच देशात कोरोनाने शिरकाव केला. पुढे स्थानिक पातळीवर संसर्ग अधिक वाढल्याचे सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात दिसून आले. आयआयटी मंडीच्या सहाय्यक प्राध्यापिका सरिता आझाद यांनी रविवारी ही माहिती दिली. सर्वेक्षण केलेल्या कोरोना रुग्णांपैकी सर्काधिक 144 जण दुबईतून, तर 64 जण लंडनमधून आल्याचे आढळले.
राज्याराज्यांत कसा झाला फैलाव?
लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात तामीळनाडू, दिल्ली आणि आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. मात्र पुढे या राज्यांच्या तुलनेत गुजरात, राजस्थान, केरळ, कर्नाटक, जम्मू-कश्मीर आणि महाराष्ट्रातील पॉझिटिक्ह रुग्णांमुळे स्थानिक पातळीवर कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला. इतकेच नव्हे तर, या राज्यांतील रुग्णांनी परराज्यात विषाणूला नेले, असेही आयआयटी मंडीच्या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.

























































