170 देशांत कोरोनाचा संसर्ग; 8790 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरसने सर्वाधिक हाहाकार युरोपमध्ये माजविला आहे. इटलीमध्ये 24 तासांत तब्बल 475 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, 170 देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला असून, बुधवारपर्यंत मृतांची संख्या 8790 वर गेली.

  • आतापर्यंत चीनमध्ये सर्वाधिक 3267 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर इटलीमध्ये 2978 जणांचा मृत्यू झाला आहे. 24 तासांत तब्बल 475 जणांचा बळी गेला. स्पेनमध्ये 623, फ्रान्स 175, अमेरिका 116, ब्रिटनमध्ये 71 जणांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये मृतांची संख्या 1135 वर गेली आहे.
  • कोरोना विषाणूचा केंद्रबिंदू युरोपात आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
  • जगभरात 24 तासांत 78766 नवीन रुग्ण दाखल झाले. त्यातील 6434 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यात युरोपातील संख्या जास्त आहे.
  • इटली, स्पेन, फ्रान्ससह संपूर्ण युरोपातील 27 देश शटडाऊन केले गेले आहेत.

अर्थव्यवस्था सावरण्यासाठी ट्रम्प देणार 1 ट्रिलियन डॉलर्स

कोरोना व्हायरसचा जबर फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसला आहे. कंपन्या बंद, विमान वाहतूक, बाजारपेठांमधील व्यवहार जगभरात ठप्प आहेत. अमेरिकेची अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ट्रिलियन डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले आहे. ब्रिटननेही 330 अब्ज पाऊंडचे बेलआऊट पॅकेज जाहीर केले आहे.

85 कोटी विद्यार्थी शाळा, कॉलेज बाहेर

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जगातील 102 देशांमधील शाळा, महाविद्यालये पूर्णपणे बंद आहेत. यामुळे 85 कोटी विद्यार्थ्यांना घरातच रहावे लागत आहे. या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.