मोदी सरकारचे धोरण देशाच्या एकात्मतेला चूड लावणारे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शरद पवार – 1) 18 जुलै, 1978 ते 17 फेब्रुवारी, 1980 (पुलोद), 2) 26 जून, 1988 ते 25 जून 1991 (काँग्रेस), 3) 6 मार्च, 1993 ते 14 मार्च, 1995 (काँग्रेस)

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संपूर्ण देश सध्या धर्मांधतेचा आगीत होरपळत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची फोडा आणि झोडा नीती देशाच्या एकात्मतेलाच चूड लावण्याचे काम करीत आहे, असे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना सोडले. जातीपातीत विद्वेषाचे विष पेरून आपला कार्यभाग साधून घेणाऱ्या मोदी सरकारला सत्तेतून उखडून फेकण्यासाठी तुम्ही सज्ज राहा, असे आवाहन पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्षकार्यकर्त्यांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातव्या राष्ट्रीय अधिवेशनाला आज नवी दिल्लीत प्रारंभ झाला. अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल्ल पटेल, लोकसभेतील गटनेते खासदार तारिक अन्वर, खासदार डी. पी. त्रिपाठी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मान्यवर उपस्थित होते.

अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे तर्कवितर्कांना उधाण
देशाच्या राजधातीत पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होत असताना तसेच पक्षाध्यक्ष शरद पवार भाजप सरकारविरोधात हल्लाबोल करत असताना पवारांचे पुतणे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज अधिवेशनाला अनुपस्थित असल्याने तर्कवितर्कांना चांगलेच उधाण आले होते.