नगर जिल्ह्यात प्रेयसीची प्रियकरासोबत आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शेवगाव

शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव येथील एका 16 वर्षीय प्रेयसीने आपल्या प्रियकारसोबत आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळालेले नाही.

शेवगाव पासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगणगाव येथील संपत मिसाळ यांच्या विहिरीमध्ये युवक व युवतीचा मृतदेह तरंगत असल्याचे त्यांनी पाहिले.  शेवगाव पोलीस स्टेशनला दोन दिवसापूर्वी एका 40 वर्षीय महिलेने आपली मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. मुलीच्या घरच्यांनी तिचा इतरत्र शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यांच्या शेजारी राहणारा राजेंद्र शिंदे (25) हादेखील दोन दिवसापासून गावातून बेपत्ता असल्याचे त्यांना समजले होते. तिच्या आईच्या फिर्यादीवरून  गुरुवारी  पोलिसांनी  राजेंद्र शिंदे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

सोमवारी दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत एकाच विहीरत सापडल्याने त्यांनी प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्याठिकाणी क्रेनच्या मदतीने विहिरीत गावकऱ्यांनी उतरून दोन्ही मृतदेह वर काढले. या ठिकाणी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने थोडाकाळ तणावही निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच दक्षता घेतल्याने तणाव निवळला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.