खूशखबर! मुलांच्या लसीकरणाला गती मिळणार, ‘कोवोव्हॅक्स’ला डीसीजीआयचीही मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरोधी लढा आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने हिंदुस्थानने पुढचे पाऊल टाकले आहे. देशात 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सिरम इन्स्टिटय़ूटच्या ‘कोवोव्हॅक्स’ या कोरोना प्रतिबंधक लसीचा वापर करण्यास ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानेसुद्धा आपत्कालीन मंजुरी दिली आहे. सिरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी बुधवारी ही खूशखबर दिली.

18 वर्षांखालील वयोगटासाठी मंजुरी मिळालेली ही चौथी लस आहे. तज्ञांच्या समितीने गेल्या आठवडय़ात 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवोव्हॅक्सचा वापर करण्याबाबत शिफारस केली होती.

5 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी ‘कोर्बेव्हॅक्स’ला मागितली मंजुरी

हैदराबादच्या बायोलॉजिकल-ई या औषध निर्मात्या कंपनीने 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘कोर्बेव्हॅक्स’ लसीचा वापर करण्यास परवानगी मागितली आहे. कंपनीने कोरोना लसीकरणासंबंधी केंद्राच्या विषय तज्ञ समितीकडे अर्ज केला असून लसीचा प्रभावीपणा सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रेही सादर केली आहेत. त्यामुळे या लसीला लवकरच मंजुरी मिळून लहान मुलांसाठी कोरोना संरक्षण कवच उपलब्ध होणार आहे.