कोविन ऍपचा गोंधळ सुरूच, दुसरा डोस घेण्याआधीच लसीकरणाचे प्रमाणपत्र

मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात लसीकरणाला आलेल्या ज्येष्ठ दांपत्याला दुसरा डोस घेण्याआधीच लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याने कोविन ऍपमधील तांत्रिक गोंधळ अजूनही संपलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राजावाडी रुग्णालय प्रशासनाची कोणतीही चूक नसताना रुग्णालय आणि या ज्येष्ठ दांपत्याला नाहक मनःस्ताप सहन करावा लागला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य आणि मुंबई महापालिकेकडून लसीकरण मोहीम राबवली जात आहे. मात्र लसीकरणादरम्यान अनेक वेळा कोविन ऍपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने लसीसाठी आलेल्या रहिवाशांना आणि रुग्णालय प्रशासनाला नाहक त्रास मनस्ताप सहन करावा लागत आहे.

घाटकोपर येथील विठ्ठल नाईक आणि त्यांच्या पत्नी सरस्वती नाईक हे दोघेही ज्येष्ठ नागरिक आहेत. कोरोना काळात त्यांना घराबाहेर जाता येत नव्हते, मात्र त्याही परिस्थितीत त्यांनी लसीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला. 12 मार्चला त्यांनी राजावाडी रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर त्यांना 28 दिवसांनंतर दुसरा डोस घेण्यास यावे लागेल, असे सांगण्यात आले. नाईक कुटुंबीय 28 दिवसांनी राजावाडीत दुसरा डोस घेण्यासाठी आले असता त्यांना दुसरा डोस घेण्यात आल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याने हा गोंधळ समोर आला.

‘त्या’ दांपत्याला लसीपासून वंचित ठेवणार नाही

लसीचा दुसरा डोस घेण्याआधीच लस घेतल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याने नाईक कुटुंबीयांमध्ये आता आपल्याला दुसरा डोस मिळेल की नाही याची भीती आहे. याबाबत त्यांनी कोविन ऍपवर तसेच पालिकेच्या घाटकोपर येथील एन विभाग कार्यालयातही तक्रार दिली आहे. दरम्यान, आज राजावाडीतील लसीकरण केंद्राला महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट देऊन लसीकरणाचा आढावा घेतला. कोणत्याही परिस्थितीत या दांपत्याला दुसऱया डोसपासून वंचित ठेवणार नाही, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर आणि आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी दिली.

चुकीच्या बातम्यांमुळे डॉक्टरांच्या मनोधैर्यावर परिणाम

हा सगळा प्रकार कोविन ऍपमधील तांत्रिक अडचणीमुळे निर्माण झाला आहे. त्याचा रुग्णालय प्रशासनाशी कोणताही संबंध नाही, मात्र काही मीडिया याचे खापर रुग्णालय प्रशासनावर फोडत आहे. या प्रकरणाची सर्व चौकशी सुरू आहे. मात्र अशा चुकीच्या बातम्यांमुळे कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेऊन रुग्णसेवा करत असणाऱया डॉक्टरांच्या मनोधैर्यावर परिणाम होत असल्याची खंत राजावाडी रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. विद्या ठाकूर यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या