थंडीपासून संरक्षणासाठी गाईंना जूटचे कोट, अयोध्या महानगरपालिकेचा उपक्रम

374

उत्तर हिंदुस्थानात पडणाऱया कडाक्याच्या थंडीमुळे अनेकांचा बळी जातो. यात गुरेढोरेही असतात. उत्तर प्रदेशातही हीच परिस्थिती असते. त्यामुळे थंडीपासून गाईंचा बचाव करण्यासाठी अयोध्या महानगरपालिका गोशाळांमधील गाईंना जूटचे कोट शिवण्याचा उपक्रम राबवणार आहे. सध्या हा प्रायोगिक तत्त्वावरील उपक्रम अयोध्येपुरता मर्यादित आहे. मात्र, तो यशस्वी झाला तर संपूर्ण उत्तर भारतातील गोशाळांमधील गाईंसाठी जूटचे कोट शिवले जाणार आहेत.

थंडीपासून बचावासाठी अयोध्या महानगरपालिकेची अयोध्येपासून 16 किलोमीटरवर बेसिंगपूरमध्ये गोशाळा आहे. या गोशाळेत एकूण 1200 गुरेढोरे आहेत. यात 700 ते 800 सांड असून बाकीच्या गायी आहेत. ‘कोट शिवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रज्जू पांडे या शेतकऱयाकडून हे कोट शिवून घेतले जात आहेत. त्यातील काही नमुने आल्यानंतर या संपूर्ण उपक्रमासाठी किती पैसे लागतील, हे स्पष्ट होईल,’ असे महानगरपालिकेचे आयुक्त सच्चिदानंद सिंह यांनी सांगितले.

सध्या थंडीपासून वाचण्यासाठी राज्यभरातील गोशाळांमध्ये गाईंना बॅग दिली जाते. मात्र, बॅग सतत घसरत असल्यामुळे ती कटकटीची ठरत आहे. त्यावर पर्याय म्हणून आता गाईंना जूटचे कोट शिवले जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या