गायीचे दूध सोमवारपासून दोन रुपयांनी महागणार; नवे दर होणार लागू

गायीच्या दूध विक्रीच्या दरात लिटरमागे 2 रुपये दराने तर खरेदीदरात 1 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक कल्याणकारी संघाने घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना सोमवारपासून गायीच्या दुधासाठी लिटरमागे 2 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. एका लिटर दुधासाठी आता 46 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना 28 ऐवजी 29 रुपये दर मिळणार आहे.

‘खासगी दूध डेअरी चालकांनी गायीच्या दूध खरेदीचा दर प्रती लिटर 30 रुपये केला आहे. तर सहकारी दूध संघाकडून खरेदीदर 28 रुपये प्रतिलिटर देण्यात येत आहे. खासगी संस्थांनी केलेल्या खरेदीदरातील वाढीमुळे दूध उत्पादक कल्याणकारी संघाने शेतकऱ्यांना खरेदीदरात 1 रुपया वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता खरेदीदर 29 रुपये झाला आहे. तसेच दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे.

पिशवीतील दूध विकणाऱ्या सहकारी संस्थांचा प्रती लिटर दोन रुपयांनी विक्रीचा दर वाढविण्याचा प्रस्ताव होता. त्याबाबत दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची शनिवारी पुण्यात बैठक झाली. त्या बैठकीतील निर्णयाची दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या