
त्रिपुरामध्ये येत्या फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. सध्या त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपला सत्तेवरून हटविण्यासाठी त्रिपुरात सीताराम येचुरी यांच्या माकपने व काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. काँग्रेस व माकपने निवडणूकीच्या आधी युती केली असून माकपचे राष्ट्रीय सचिव सीताराम येचुरी यांनी बुधवारी याची घोषणा केली.
बुधवारी सीताराम येचुरी व काँग्रेसचे त्रिपुराचे निवडणूक प्रभारी मुकुल वासनिक यांच्यामध्ये अगरताला येथे एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर येचुरी यांनी काँग्रेस व माकपच्या युतीची घोषणा केली. ”आगामी निवडणूक ही त्रिपुराच्या जनतेच्या दृष्टीने तर महत्त्वाची आहेच सोबत लोकशाही, संविधान, कायदा वाचविण्यात देखील महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. इशान्य हिंदुस्थान, तेथील प्रगती व राष्ट्रीय राजकारण यात या निवडणूकीचा मोठा वाटा असणार आहे”, असे येचुरी यांनी सांगितले.



























































