महिलांच्या डब्यातील घुसखोरांना दणका आता अडीच हजारांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवासी तसेच ट्रेनच्या राखीव डब्यांतून प्रवास करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. यापुढे महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांतून प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांकडून अडीच हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. रेल्वे प्रवासाशी संबंधित विविध गुन्ह्यांतील दंडाच्या रकमेत प्रशासनाने वाढ केली आहे.

देशभरातील लोकल आणि पॅसेंजर गाड्यांमध्ये महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र अनारक्षित डबे उपलब्ध करून दिले जातात. मुंबई, कोलकाता, सिकंदराबाद आणि चेन्नई यांसारख्या शहरांतील उपनगरीय रेल्वे मार्गावर ‘लेडीज स्पेशल’ गाड्याही चालवल्या जातात. रेल्वे कायद्याच्या कलम १६२ अन्वये महिलांच्या राखीव डब्यांत पुरुषांनी प्रवेश करणे आणि महिलांच्या राखीव आसनांवर बसणे हा दंडनीय गुन्हा आहे. अशा नियमांच्या उल्लंघनासाठी दंड आणि कारावास या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. या गुन्ह्यांतील दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. ‘जन विश्वास कायदा, २०२६’मधील तरतुदींनुसार रेल्वे कायद्याच्या कलम १६२ अन्वये गुन्ह्यांसाठीचा दंड ५०० रुपयांवरून २५०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.