वॉर्नरचा त्रिशतकी धमाका; ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 3 बाद 589 धावांवर घोषित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाचा आघाडीवीर डेव्हिड वॉर्नरने नाबाद त्रिशतकी खेळी करून पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱया दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामन्यातील शनिवारचा दिवस गाजवला. ऑस्ट्रेलियाने 127 षटकांत 3 बाद 589 धावांचा डोंगर उभारून पहिला डाव घोषित केला. वॉर्नरने आपल्या 335 धावांच्या नाबाद खेळीत एका षटकारासह 39 चेंडू सीमापार पाठविले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानची उर्वरित 35 षटकांच्या खेळात 6 बाद 96 अशी दाणादाण उडाली. दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा बाबर आझम 43, तर यासिर शहा 4 धावांवर खेळत होते.

मॅरेथॉन भागीदारी

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाच्या 1 बाद 302 धावसंख्येवरून शनिवारी पुढे खेळायला सुरुवात केली. 166 धावांवर नाबाद परतलेला डेव्हिड वॉर्नर आणि 126 धावांवर नाबाद परतलेला मार्नस लॅबुशेग पुन्हा फलंदाजीला आले. या दोघांनीही आजही पाकिस्तानी गोलंदाजीचा सहज सामना केला. वॉर्नर-लॅबुशेग जोडीने दुसऱया गडय़ासाठी 361 धावांची मॅरेथॉन भागीदारी रचली. शाहिन शाह आफ्रिदीने लॅबुशेगचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. लॅबुशेगने 238 चेंडूंना सामोरे जाताना 22 चौकारांसह 162 धावा फटकावल्या. त्याच्या जागेवर आलेल्या स्टिव्हन स्मिथने 36 धावांची खेळी केली. त्यालाही आफ्रिदीनेच यष्टीमागे मोहम्मद रिझवानकरवी झेलबाद केले. त्यानंतर मॅथ्यू वेडने नाबाद 38 धावांची खेळी करीत वॉर्नरला साथ दिली. ऑस्ट्रेलियाचे तिन्ही फलंदाज याच आफ्रिदीने बाद केले.

33 वर्षीय डेव्हिड वॉर्नरने 21 व्या षटकातील तिसऱया चेंडूवर षटकार ठोकून 308 धावसंख्येपर्यंत पोहोचून गुलाबी चेंडूवर सर्वाधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम केला. त्याच्या आधी पाकिस्तानच्या अझहर अलीने वेस्ट इंडीजविरुद्ध ऑक्टोबर 2016 साली नाबाद 302 धावांची खेळी करून गुलाबी चेंडूवर पहिले त्रिशतक ठोकले होते. याचबरोबर ऍडलेड मैदानावर तिहेरी शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला. याआधी 1932 साली डॉन ब्रॅडमन यांनी या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 299 धावांची खेळी होती. ब्रॅडमन यांचा विक्रम शनिवारी वॉर्नरने मोडीत काढला. पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावणारा वॉर्नर चौथ्या फलंदाज ठरला, तर सलामीला त्रिशतक ठोकणारा तो जगातील 16 वा फलंदाज होय. ऑस्ट्रेलियाकडून त्रिशतकी खेळी करणारा वॉर्नर सातवा, तर चौथा सलामीवर ठरला.