द्रोणाचार्य गेले! रमाकांत आचरेकर कालवश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

क्रिकेटमधील ‘भीष्माचार्य’ आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू घडवणारे ‘द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. शिवाजी पार्क येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे.

रमाकांत आचरेकर यांचा जन्म 1932 साली झाला. 1945 पासून न्यू हिंद स्पोर्टस् क्लबमधून त्यांनी क्रिकेटचा श्रीगणेशा केला. ते प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले, पण क्रिकेट प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने चमकदार ठरली. शिवाजी पार्कमध्ये त्यांनी कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली.

सचिनसह विनोद कांबळी, प्रवीण अमरे, चंद्रकांत पंडित, संजय बांगर, बलविंदर संधू, रमेश पोवार या क्रिकेटपटूंना आचरेकर यांनी घडवले. 1990 मध्ये त्यांना ‘द्रोणाचार्य’, 2003 मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘श्री शिवछत्रपती जीवनगौरव’ तर 2010 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

सरांनी मैदानात आणि मैदानाबाहेरही ‘सरळ’ खेळायला शिकवलं!सचिन तेंडुलकर

आचरेकर सरांनी आम्हाला मैदानात आणि मैदानाबाहेर नेहमी सरळ खेळ खेळायला शिकवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी क्रिकेटची बाराखडी शिकलो. आचरेकर सरांसारखे गुरू मला लाभले हे माझे भाग्य समजतो. आता स्वर्गातले क्रिकेटही सरांमुळे समृद्ध होईल. माझ्या आयुष्यात त्यांचे मोठे स्थान आहे. त्याचे शब्दांत वर्णन करता येणार नाही. सरांनी पाया भक्कम केल्यामुळेच मी इथपर्यंत मजल मारू शकलो. काही दिवसांपूर्वीच त्यांना भेटलो होतो. तेव्हा आमच्यासोबत लहान मुलेही होती. जुन्या आठवणींना त्यावेळी उजाळा मिळाला होता.