
हिंदुस्थानी क्रिकेट संघाने मेलबर्न येथील दुसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. ऐतिहासिक विजयामुळे टीम इंडियाने सिडनी येथील तिसऱया कसोटीआधी आत्मविश्वास मिळवला पण प्रत्यक्षात तिसऱया कसोटीसाठी हिंदुस्थानी संघासमोर मोठा पेचप्रसंग उभा ठाकला आहे. रोहित शर्माला उर्वरित दोन कसोटींसाठी हिंदुस्थानी संघात स्थान मिळाले आहे. रोहित शर्माला तिसऱया कसोटीत स्थान मिळेल हे जवळपास निश्चित आहे. पण त्यामुळे हिंदुस्थानी संघाला विजयी संघात बदल करावा लागणार आहे. मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांच्यापैकी एकाला संघाबाहेर काढल्यानंतरच रोहित शर्मासाठी जागा तयार होणार आहे. शुभमन गिलने मेलबर्न कसोटीत सलामीला खेळताना चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याला बाहेर काढण्यात येईल असे वाटत नाही. बघूया आता हिंदुस्थानी संघ व्यवस्थापन कोणता निर्णय घेतेय ते.
सलामीवीर की मधल्या फळीतील फलंदाज?
रोहित शर्माला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतल्यास तो कोणत्या स्थानावर फलंदाजी करील, हाही यक्षप्रश्न यावेळी निर्माण होत आहे. अर्थात रोहित शर्मा सलामीवीर तसेच मधल्या फळीतही फलंदाजी करतो. त्यामुळे तो दोन्ही जागांवर फलंदाजीसाठी तयार असेल. पण प्रदीर्घ विश्रांतीनंतर ऑस्ट्रेलियासारख्या वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱया खेळपट्टीवर तो सलामीला खेळणे कितपत पसंत करील हेही महत्त्वाचे ठरणार आहे. मधल्या फळीत त्याला खेळवलं की हनुमा विहारीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. याप्रसंगी संघ व्यवस्थापनही कोणता निर्णय घेते हे पाहायला नक्कीच आवडणार आहे.
गोलंदाजीतही बदल होण्याची शक्यता
हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला दुसऱया कसोटीदरम्यान दुखापतीला सामोरे जावे लागले. त्यामुळे तिसऱया कसोटीत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. त्याच्याऐवजी नवदीप सैनी आणि टी. नटराजन या वेगवान गोलंदाजांपैकी एकाला संघात संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईकर शार्दुल ठाकूरही टीम इंडियासोबत आहे. पण त्याला अंतिम अकरामध्ये चान्स देण्यात येईल असे वाटत नाही. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा हे गोलंदाज संघात कायम असणार आहेत.
‘हिटमॅन’ संघासोबत
हिटमॅन या नावाने ओळखला जाणारा रोहित शर्मा बुधवारी टीम इंडियासोबत जोडला गेला आहे. सिडनी येथे त्याने क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला. त्यानंतर तो संघाशी जोडला गेला आहे. अशी माहिती बीसीसीआयकडून सोशल साईटवर देण्यात आली.
दोघांनाही खेळवण्याचा निर्णय घेण्यात येईल का?
हिंदुस्थानी क्रिकेट संघ मेलबर्न कसोटीत पाच गोलंदाजांसह मैदानात उतरला. त्यामुळे सिडनी कसोटीतही याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळेल यात शंका नाही. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr यांनीही मेलबर्नमधील विजयानंतर याचे संकेत दिले. त्यामुळे हिंदुस्थानी संघात पाच गोलंदाज, एक यष्टिरक्षक आणि पाच फलंदाज यांचा समावेश केला जातो. अशा परिस्थितीत रोहित शर्मा व लोकेश राहुल या दोन्ही खेळाडूंना संधी देऊन मयांक अग्रवाल व हनुमा विहारी या दोघांना डच्चू देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र विजयी संघात जास्त बदल केले जातील असे वाटत नाही.



























































