हिंदुस्थान-इंग्लंड क्रिकेट मालिका मुंबईत होण्याची शक्यता

हिंदुस्थानातील कोरोना अद्याप नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे आयपीएल ही टी-20 स्पर्धा यूएईत खेळवण्यात येत आहे. तसेच हिंदुस्थानातील स्थानिक मोसमाचे वेळापत्रकही अद्याप तयार करण्यात आलेले नाहीए. शिवाय आंतरराष्ट्रीय दौऱयांबाबतही अद्याप प्रश्नचिन्ह आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी दोन दिवसांपूर्वीच हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील पुढल्या वर्षी होणारी मालिका तीन स्टेडियम्सची उपलब्धता असलेल्या मुंबईत खेळवण्यात येऊ शकते असे वक्तव्य केले. यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनकडूनही (एमसीए) मालिका आयोजनासाठी रस असल्याचे दाखवून दिले आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. अर्थात देशातील कोरोनाच्या स्थितीवरही सर्व काही अवलंबून असणार आहे.

मायदेशात मालिका खेळवण्यासाठी प्रयत्न

हिंदुस्थान-इंग्लंड मालिका हिंदुस्थानात खेळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी हिंदुस्थानातील कोरोनाच्या परिस्थितीकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. मुंबई किंवा कोलकाता यांच्यापैकी एका ठिकाणी ही मालिका होऊ शकते, असे सौरभ गांगुली यांच्याकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, याआधी हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील मालिका यूएईमध्ये खेळवण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत असल्याचे वृत्त मीडियामधून प्रसिद्ध करण्यात आले होते.

वानखेडे, ब्रेबॉर्न, डी. वाय. पाटील स्टेडियमवर लढती होऊ शकतील

काही दिवसांपूर्वीच एमसीएचे नदीम मेमन यांनी सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा मुंबईत खेळवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. बीसीसीआयकडून आम्हाला आयोजनाची संधी मिळायला हवी, असे मत व्यक्त केले होते. आता हाच धागा पुढे पकडून बीसीसीआयकडून मुंबईत हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील मालिका खेळवण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. मुंबईमध्ये वानखेडे, ब्रेबॉर्न, डी. वाय. पाटील ही तीन आंतरराष्ट्रीय दर्जाची स्टेडियम्स असून पंचतारांकित हॉटेल्सही उपलब्ध आहेत. दोन्ही संघांतील खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अधिकारी यांच्या आरोग्याची काळजीही यावेळी घेतली जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या