विनोद कांबळीचा एक असा विक्रम जो ‘क्रिकेटचा देव’ही मोडू शकला नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानचा माजी खेळाडू आणि सचिनचा विक्रमवीर भागीदार विनोद कांबळी याने आजच्याच दिवशी 29 जानेवारी 1993 ला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर जोडी सर्वांना चिरपरिचित आहेच, तसेच त्यांच्या खेळाचेही दिवाने लाखो आहेत. दोघांनीही जवळपास एकाच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. परंतु सचिनची कारकीर्द जवळपास 25 वर्षे चालली तर कांबळीची कारकीर्द थोडक्यात आवरली.

विनोद कांबळीने हिंदुस्थानकडून 17 कसोटी सामने खेळेल. 21 व्या वर्षी कसोटीत पदार्पण करणाऱ्या कांबळीने 23 व्या वर्षी अखेरचा कसोटी सामना खेळला. परंतु या छोट्याशा कारकीर्दीतही त्याने केलेले काही विक्रम आजही अबाधित आहेत. यात कांबळीचा एक असा विक्रम आहे जो प्रत्यक्षात क्रिकेटचा देव सचिनही मोडू शकला नाही.

कांबळीच्या नावावर सर्वात कमी वयात हिंदुस्थानी संघाकडून द्वीशतक ठोकण्याचा विक्रम आहे. 21 वर्ष 32 दिवस पूर्ण झाले त्या दिवशी कांबळीने इंग्लंडविरुद्ध मुंबईत झालेल्या सामन्यात 224 धावांची खेळी केली आणि हिंदुस्थानकडून सर्वात कमी वयात द्वीशतक ठोकण्याचा मान मिळवला. सचिनला द्वीशतक ठोकण्यासाठी 26 व्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागली. त्याने पहिले द्वीशतक न्यूझीलंडविरुद्ध 1999 मध्ये ठोकले होते.