सामना ऑनलाईन, मॅनचेस्टर
मॅनचेस्टर इथे मंगळवारी खेळवण्यात आलेल्या न्यूझीलंड विरूद्ध हिंदुस्थान सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अर्धवट राहिला आहे. हा सामना काल जिथे थांबला होता तिथून पुढे सुरू होणार आहे. जर आजच्या खेळात पुन्हा पावसाने व्यत्यय आणला तर डकवर्थ लुईस नियमानुसार सामना खेळवला जाईल. जर हा नियम लागू झाला तर हिंदुस्थानी संघाला 6 ते 7 धावा प्रति षटके या गतीने खेळावं लागणार आहे. या नियमानुसार हिंदुस्थानी संघासमोर किती षटकांत किती धावांचे आव्हान असेल ते पाहूयात.
20 षटके-148 धावा
25 षटके- 172 धावा
30 षटके- 192 धावा
35 षटके- 209 धावा
40 षटके- 223 धावा
46 षटके- 237 धावा
आजही जर पाऊस झाला आणि न्यूझीलंडचा संघ त्यांचा डाव पूर्ण करू शकला नाही तर तर सामन्याचा निकाल लागण्यासाठी हिंदुस्थानी संघाला किमान 20 षटके तरी खेळावी लागतील. जर तितकी षटके पावसामुळे खेळता आली नाही तर सामन्याचा निकाल लागू शकणार नाही. मंगळवारी हिंदुस्थानी संघाने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींची इच्छा आज हीच असेल की आजही धुवांधार पाऊस पडावा आणि आजच्या दिवसाचा खेळ वाया जावा. असं झालं तर हिंदुस्थानी संघ सरस धावसंख्येच्या आधारे अंतिम फेरीत प्रवेश करू शकेल. हिंदुस्थानी संघाच्या खात्यावर सध्या 15 गुण आहेत तर न्यूझीलंडच्या खात्यावर 11 गुण आहेत.
मॅनचेस्टरमध्ये हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी अत्यंत प्रभावी गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना सुरुवातीपासून जखडून ठेवले होते. ही बाब मान्य असली तरी मॅनचेस्टरची खेळपट्टी ही फलंदाजांना फारशी साथ देणारी नाहीये. ढगाळ वातावरणामुळे चेंडू स्विंग होऊ शकतो तसेच चहल, जाडेजा यांच्या प्रभावी फिरकी गोलंदाजीमुळे ही खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देणारी असल्याचं स्पष्ट झालंय. अशा वातावारणामध्ये फलंदाजांना वेगाने धावा करणं शक्य होत नाही.




























































