
सामना प्रतिनिधी । मुंबई
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतचे आदेश दिले. अटक करण्यात आलेल्या तिन्ही डॉक्टरांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपत आहे.
नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीने गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास आग्रीपाडा पोलीस करत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आठ दिवसांनी पोलिसांनी डॉ. भक्ती, डॉ. अंकिता आणि डॉ. हेमा यांना मुंबई आणि पुणे येथून अटक केली. डॉ. पायल यांचे वकील नितीन सातपुते यांनी या केसचा तपास सीबीआय किंवा गुन्हे शाखेकडे सोपवण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानुसार डॉ. पायल आत्महत्येचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट 3 कडे सोपवण्यात आला. पोलिसांनी डॉ. पायलचा पती सलमान आणि तिची आई आबेदा यांचा पुन्हा जबाब नोंदवून घेतला.
न्याय मिळवून देणार, मुख्यमंत्र्यांचे तडवी कुटुंबाला आश्वासन
डॉ. पायल तडवीचे आईवडील व लोकसंघर्ष संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पायलच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अंकिता खंडेलवाल, हेमा आहुजा व भक्ती मेहेर यांची सखोल चौकशी करावी. तसेच या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्याची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आस्थेने सर्व घटनाक्रम समजून घेतला व घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्य़क्त करत शासन तडवी कुटुंबीयांच्या मागे खंबीरपणे उभे राहून न्याय मिळवून देईल. तसेच दोषींना पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही अशी कठोर शिक्षा करण्यात येईल. गुन्ह्याचा तपास क्राइम ब्रँचकडे सोपविण्यात येत असल्याचे सांगितले. शिवसेना उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी देखील बुधवारी या खटल्यातील वकील ऍड. सातपुते यांच्याशी चर्चा केल्यांनतर हा तपास क्राइम ब्रँचकडे सोपविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

























































