
सामना प्रतिनिधी । मुंबई
चेंबुर येथे टोलेजंग इमारतीचे बांधकाम सुरु असताना 13 व्या फुटावरून तोल जाऊन 24 वर्षीय कामगार राकेश जाधव गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. याठिकाणी असलेली लोखंडी सळई कामगाराच्या छातीत घुसुन ती डोक्यातून बाहेर पडल्याने गंभीर दुखापत झाली. प्रसंगावधान राखून त्वरीत चेंबूर येथील झेन रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या टिमने घेतलेल्या अथक परिश्रमानंतर या रुग्णाला वाचविण्यात यश आले.
चेंबुर येथील झेन मल्टीस्पेशॅलिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखविलेल्या हजरजबाबीपणामुळे या रुग्णाचा जीव वाचविण्यात यश आले. डॉ बटुक डिओरा, डॉ प्रमोद मस्जीद, डॉ प्रमोद काळे तसेच त्यांच्या टिमने केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. सलग पाच तास सुरु असलेली ही शस्त्रक्रीया खरोखरच आव्हानात्मक ठरल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मेंदुला रक्तपुरवठा करणारी वाहिनीला गंभीर दुखापत झाल्याने ही शस्त्रक्रिया अतिशय आव्हानात्मक ठरली. अशा प्रकरणात रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती असे झेन रुग्णालयाचे संचालक डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले.




























































