
देशाच्या संघाचा विजय म्हटलं कि मोठी व्यक्तीही स्थळ ,उपस्थित मान्यवर हे सगळे विसरून संघाच्या विजयाचा आनंद देहभान विसरून करते. रविवारी रात्री फिफा विश्वचषकातील यजमान रशिया आणि जाएंट किलर म्हणून ओळखला जाणारा क्रोएशिया संघांतील लढतीशेवटी असेच चित्र दिसले. स्टेडियमच्या व्हीआयपी कक्षात बसलेल्या क्रोएशिअन राष्ट्राध्यक्षा कोलिंडा ग्राबरकितारोविक यांनीही थेट रशियन पंतप्रधान दिमित्री मेडव्हीदेव यांच्या समोरच आपल्या संघाच्या विजयाचे सेलेब्रेशन साजरे केले. स्टेडियममध्ये येताना त्यांनी क्रोएशिअन संघाचा लाल सूट आणि लाल कोट परिधान करून व्हीआयपी कक्षात प्रवेश केला. त्यांच्या शेजारी रशियन पंतप्रधानांव्यतिरिक्त फिफाचे अध्यक्ष जियान्नी इन्फानटिनो हेही बसले होते.
रशिया आणि क्रोएशिया यांच्यातील उपांत्यपूर्व लढतीसाठी सोचीचे स्टेडियम खचाखच भरलेले होते. मेडव्हीदेव आणि ग्राबरकितारोविक उभय संघानी गोल केला कि उठून एकमेकांशी हस्तांदोलन करीत होते.अतिरिक्त वेळेनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने ४-३ अशी बाजी मारल्यावर कोलिंडा आपले वय आणि पद विसरून व्हीआयपी कक्षातच देहभान विसरून नाचू लागल्या. त्यांनी टी शर्टवरील कोटही काढून टाकला होता. क्रोएशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा कोलिंडा आपल्या संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर आनंदाने नाचत असताना यजमान रशियाचे पंतप्रधान मेडव्हीदेव मात्र खिन्न मनाने कोलिंडा यांचे सेलेब्रेशन पाहत होते.असा नजारा क्रोएशिअन विजयानंतर व्हीआयपी कक्षात दिसला. दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाची उपांत्यफेरी गाठणाऱ्या क्रोएशिअन संघाने ड्रेसिंग रूममध्ये केलेल्या विजयाच्या सेलेब्रेशनलाही रोलिंडा हजर राहिल्या. तेथेही त्यांनी आपल्या फुटबॉलपटूंच्या आग्रहाखातर डान्समध्ये सहभाग घेतला.
यजमान रशियाचेही कौतुक
क्रोएशिअन राष्ट्राध्यक्षा कोलिंडा यांनी यजमान रशियन संघाच्या चमकदार कामगिरीचेही कौतुक केले,विशेष म्हणजे माजी विजेत्या स्पेनला पराभूत करून रशियाने शेवटच्या ८ संघांत स्थान मिळवले होते. या पराक्रमाची त्यांनी मुक्त कंठाने स्तुती केली.



























































