भरलेला पाझर तलाव पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी

424

सामना ऑनलाईन, कळवण

तालुक्यातील पुनंद खोऱ्यात आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने इन्शी येथील पाझर तलाव 60 टक्के भरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इन्शी पाझर तलाव लालफितीत अडकला होता. पाझर तलाव भरल्याचे बघून परिसरातील शेतकरी बांधवांचे डोळे पाणावले. पाझर तलाव पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी रोहयो योजनेत अडकलेल्या इन्शी पाझर तलावासह इतर तलावांचे अपूर्णावस्थेत असलेले काम पूर्ण करण्यासाठी राज्य शासन, ग्रामविकास विभाग यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने लालफितीच्या दृष्टचक्रातून या पाझर तलावाची सुटका केली आहे. यासाठी लाखो रुपयांचा निधी  नितीन पवार यांनी मंजूर करून आणला. इन्शी पाझर तलावाच्या कामास गेल्या काही दिवसांपासून गती आल्याने आजमितीस तलावाचे काम 80 टक्के पूर्ण झाले. पाझर तलाव 60 टक्के भरल्याने पाझर तलाव पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी गर्दी केली आहे.

इन्शी पाझर तलावाचे काम झाल्याने पाण्याची साठवण क्षमता दुरुस्तीमुळे वाढणार असून शेतकऱ्यांचा उन्हाळ्यात पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. नितीन पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाझर तलावासाठी लाखो  रुपयांचा निधी मंजूर करून आणून कामाला सुरुवात केल्याने आज पाझर तलावाच्या कामाची प्रगती व पाण्याची साठवण क्षमता बघून परिसरातील शेतकरी बांधवांचे डोळे पाणावले आहेत. या परिसरातील पाण्याच्या प्रश्नांची सोडवणूक होऊन परिसरातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या