ट्रॅक्टर बनला यांत्रिक शेतीचा मानबिंदू, अहमदपूर तालुक्यात ट्रॅक्टरद्वारे शेतीची कामे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

शेतकऱ्याच्या अंगणात दिसणाऱ्या सर्जा राजाची बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. नांगरणी, तिर्री, पाळी आदी कामे पारंपारीक पद्धतीने करण्यात जाणारा वेळ व त्यासाठी लागणारे कष्ट शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. बदलत्या काळात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कामे करण्याचे सूत्र ट्रॅक्टरच्या माध्यमातून साकार होत आहेत. त्यामुळे त्याद्वारे शेतीची मशागत करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिवसें दिवस वाढत आहे. लहानशा खेड्यातही छोट्या शेतकऱ्याच्या दारापुढे ट्रॅक्टर दिसण्याचे कारण यांत्रिक शेतीला दिले जाणारे प्राधान्य हेच आहे.

उन्हाने तप्त झालेली कडक जमीन नांगरता नांगरता महीना जात होता. खाच खळग्याची शेत जमीन सपाट करण्याचे कामही तेवढेच वेळखाऊ होते. शेतीच्या कामाकरीता मजूर मिळत नाहीत. दुष्काळजन्य परिस्थिती, चारा टंचाई त्यामुळे बैलजोडी नामशेष होऊन गेल्या. कांही वर्षात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. शेतकरी आता शेती मशागतीची कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करीत आहेत. मात्र डिझेल दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. डिझेलचे दर ७० रुपयांच्या आसपास असल्यामुळे एकरी ट्रॅक्टरचे दरही वाढले आहेत. नांगरणी १४०० रुपये एकरी, तीररी ७०० रुपये एकरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी भाव वाढले आहेत. त्यामुळे पारंपारिक शेती मागे पडून आधुनिक शेती ट्रॅक्टरव्दारे शेतकरी करत असल्याचे चित्र दिसत आहे. घरासमोर ट्रॅक्टर उभा दिसल्यास सधन व आधुनिकतेची कास धरलेला शेतकरी अशी गणना होत होती. खेड्यापाड्यात डोंगर कपाऱ्यात ट्रॅक्टरचा घुमलेला आवाज शेतकऱ्यांच्या मनावर राज्य करू लागला आहे. हजार लोकसंख्येच्या लहानशा खेड्यातही शंभरावर ट्रॅक्टर आढळून येत आहेत.