संस्कृती- सामाजिक प्रबोधनाची वारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<<जी. के. पवार>>

 

वारी, वारकरी संस्कृती आणि सेवाभाव यांना जोडणारा ai दिंडी हा सर्वसमावेशक उपक्रम. परंपरा आणि नवता यांना जोडणारा हा उपक्रम सामाजिक, आध्यात्मिक प्रबोधन करणारा आहे.

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनातील पंढरपूरची वारी ही एक अद्वितीय परंपरा आहे. लाखो वारकरी दरवर्षी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. या वारीचा अनुभव अधिकतम वारकऱयांपर्यंत पोहोचावा आणि वारकरी परंपरेविषयी योग्य माहिती समाजात प्रसारित व्हावी या उद्देशाने ai दिंडी हा उपक्रम कार्यरत आहे.

ai दिंडी म्हणजे काय?

ai दिंडी या नावामागे अनेक अर्थ दडलेले आहेत. पहिला अर्थ म्हणजे All Inclusive Dindi (सर्वसमावेशक दिंडी). व्यवसाय, सामाजिक पार्श्वभूमी किंवा अनुभव यांची कोणतीही अट न ठेवता प्रत्येक भाविकाला वारीचा अनुभव घेता यावा हा या संकल्पनेचा आधार आहे.

– दुसरा अर्थ म्हणजे Adhyatmik Intelligence Dindi. वारकरी संप्रदाय, संत परंपरा, वारीचा इतिहास, तिची रचना आणि तिच्यामागील आध्यात्मिक विचार यांविषयी समाजात जागृकता निर्माण करणे हे या उपक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

– तिसरा आणि सर्वात भावनिक अर्थ म्हणजे ai म्हणजे ‘आई’ किंवा ‘माऊली.’ वारकरी परंपरेत प्रत्येक भक्त हा माऊली आहे. प्रेम, आपुलकी, समता आणि सेवाभाव या मूल्यांचे प्रतीक म्हणून ai दिंडी हे नाव निवडण्यात आले आहे.

वारीत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन

अनेक भाविकांना वारी करायची इच्छा असते, मात्र वारीचे नियोजन, मार्ग, मुक्काम, दैनंदिन कार्यक्रम, शिस्त आणि आवश्यक तयारी याबाबत पुरेशी माहिती नसल्याने ते सहभागी होण्यास संकोच करतात. ai दिंडी अशा भाविकांना वारीपूर्व मार्गदर्शन, आवश्यक माहिती आणि नियोजनाची मदत उपलब्ध करून देते. नव्या वारकऱयांना अनुभवी वारकऱयांच्या मार्गदर्शनाखाली वारीचा अनुभव घेता यावा यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. यामुळे प्रथमच वारी करणाऱया भाविकांनाही आत्मविश्वासाने आणि आनंदाने वारीत सहभागी होता येते.

टप्पा वारीअभिनव संकल्पना

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक भाविकांना संपूर्ण वारीसाठी 15 ते 20 दिवसांचा वेळ काढणे शक्य होत नाही. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा कौटुंबिक जबाबदाऱयांमुळे त्यांची वारी करण्याची इच्छा अपूर्ण राहते. या गरजेतून ai दिंडीने ‘टप्पा वारी’ ही अभिनव संकल्पना विकसित केली आहे. या वारीअंतर्गत भाविकांना त्यांच्या सोयीनुसार वारीतील कोणताही एक दिवस किंवा काही दिवस निवडता येतात. त्या दिवशी पालखी ज्या टप्प्यातून प्रवास करत असेल, त्या ठिकाणी जाण्यासाठी ai दिंडीकडून पुण्याहून वाहतुकीची व्यवस्था केली जाते. उदाहरणार्थ, शनिवारी पालखीचा मुक्काम फलटण ते बरड असा असेल आणि एखाद्या भाविकाला त्या दिवशी सुट्टी असेल तर ai दिंडीकडून पुणे ते फलटण या ठिकाणी जाण्यासाठी बसची व्यवस्था केली जाते. त्यानंतर भाविक दिवसभर पालखीसोबत चालत वारीचा अनुभव घेतात. दिवसअखेरीस बरड येथून त्याच बसद्वारे सर्व भाविकांना पुन्हा पुण्यात परत आणले जाते. या उपक्रमामुळे संपूर्ण वारी करणे शक्य नसलेल्या भाविकांनाही वारीतील नामस्मरण, वारकरी बंधुभाव, पालखी सोहळा आणि विठ्ठलभक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळते. टप्पा वारी ही संकल्पना विशेषत नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रथमच वारीचा अनुभव घेऊ इच्छिणाऱया भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

वर्षभर चालणारे उपक्रम

वारी हा ai दिंडीचा केंद्रबिंदू असला तरी संस्था वर्षभर विविध सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत असते.

भजन उपक्रम वारकरी संप्रदायातील अभंग, भजन आणि नामस्मरणाची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी नियमित भजन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामधून नव्या पिढीला वारकरी संस्कृतीचा परिचय करून दिला जातो. वारकरी खेळ आणि पावली प्रशिक्षण – वारीमध्ये खेळले जाणारे पारंपरिक वारकरी खेळ, फुगडी, पावल्या आणि इतर सांस्कृतिक परंपरा जतन करण्यासाठी विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले जाते.

वारकरी विद्यार्थ्यांसाठी करीअर मार्गदर्शन कार्यक्रमही आयोजित केले जातात. सेवाभाव जपत ai दिंडीचे सेवेकरी दर तीन महिन्यांनी नियमित रक्तदान व प्लेटलेट्स दान करून रुग्णांसाठी जीवनदायी योगदान देतात.

वारीची परंपरा, संतांचे विचार आणि वारकरी संस्कृती अधिकाधिक लोकप्रियतेत पोहोचवणे तसेच प्रत्येक भविकाला वारीचा अनुभव सुलभ, सुरक्षित आणि संस्मरणीय बनवणे हे ai दिंडीचे प्रमुख ध्येय आहे. ‘एक तरी वारी अनुभववावी’ या संदेशातून ai दिंडी अधिकाधिक भविकांना वारीशी जोडण्याचे कार्य करत आहे. ai दिंडीचे कार्य आपण www.aidindi.org या वेबसाईटद्वारे अधिक जाणून घेऊ शकता.