
मध्य प्रदेशातील खरगोन शहरात रविवारी रामनवमीच्या मिरवणुकीवेळी हिंसाचार उसळल्यानंतर शहरातील तीन भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मिरवणुकीदरम्यान हल्लेखोरांकडून दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या असून काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने शहरातील तीन भागात संचारबंदी लागू केली आहे, तर संपूर्ण शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या.
दगडफेकीत खरगोनचे पोलिस अधीक्षक सिद्धार्थ चौधरी आणि इतर दोन पोलिसांसह काही नागरिक जखमी झाले. खरगोनचे जिल्हा दंडाधिकारी अनुग्रह पी. म्हणाले की, संपूर्ण शहरात सीआरपीसीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. “तालाब चौक आणि तावडीसह शहरातील तीन भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे,” ते म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रामनवमीच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या सुरुवातीला अल्पसंख्याकबहुल भागातून दगडफेक करण्यात आली. यामध्ये तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे. प्रभावित भागात कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे.
शहरातील तालाब चौक, गोशाळा मार्ग, मोतीपुरा, स्टेडियमच्या मागे, टॉवर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. चार घरांना जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. या हिंसाचारात टीआय बनवारी मंडलोई हे देखील जखमी झाले आहेत. परिस्थिती पाहता शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रामनवमीला निघणाऱ्या मिरवणुकीत डीजे वाजवण्यास मुस्लिम समाजाच्या लोकांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर दगडफेक सुरू केल्याचे सांगण्यात आले. खरगोन येथील तालाब चौकापासून गोशाळा रस्त्यावरील शीतला माता मंदिरातही तोडफोड केल्याचे वृत्त आहे.
खरगोनचे एसपी सिद्धार्थ चौधरीही दगडफेकीत जखमी झाले आहेत. एसपी चौधरी यांच्या पायाला दुखापत झाली आहे. एसपींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, दगडफेकीनंतर जाळपोळीच्या तुरळक घटना घडल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, असे ते म्हणाले.
त्याच वेळी, खरगोनचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी सुमेरसिंग मुजल्दे यांनी सांगितले की, रामनवमीची मिरवणूक जिल्हा मुख्यालयात असलेल्या तालाब चौकातून निघताच काही समाजकंटकांनी मिरवणुकीत सामील असलेल्या लोकांवर दगडफेक केली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर इतरही काही भागात दगडफेकीच्या घटना घडल्या, असे ते म्हणाले. या घटनांमध्ये पोलिसांसह काही जण जखमी झाल्याचे मुजळदे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, ही मिरवणूक खरगोन शहरातून फेरी काढणार होती, पण हिंसाचार पाहता ती अर्ध्या रस्त्यातच थांबवण्यात आली आहे.



























































