वेब न्यूज : सोशल मीडियावरती सायबर हल्ला?

24

काही दिवसांपूर्वीच फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्सऍप आणि इंस्टा असे बरेच सोशल प्लॅटफॉर्म एकाचवेळी डाऊन झाले. जगभरातील कोटय़वधी यूजर्सना हे सोशल प्लॅटफॉर्म वापरताना अनेक अडचणी येऊ लागल्या. मुख्यतः फोटो अपलोड करणे, इतरांचे फोटो बघणे किंवा व्हिडिओ अपलोड करण्याबाबत समस्यांनी यूजर्स वैतागले होते. आता फेसबुकने आपण 100टक्के समस्यामुक्त झाल्याची पोस्ट टाकलेली असली, तरी विविध माध्यमातून यूजर्स मात्र या घटनेकडे संशयाने बघत आहेत. अनेक यूजर्सनी रशिया आणि चायनाने मिळून या अमेरिकन कंपनीवरती सायबर हल्ला केला असण्याची शक्यता वर्तवली आहे. तर काही यूजर्सनी विविध स्क्रीन शॉट शेअर करून ट्विटरवरती आपले मत व्यक्त केले आहे, त्यांच्या मते लवकरच फेसबुकचा डाटा पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणावरती लीक होण्याची शक्यता असून सलग नऊ तास फेसबुक व त्याचे इतर प्लॅटफॉर्म ठप्प होणे संशयाला अधिकच पुष्टी देत आहेत. ट्विटरच्या वापरकर्त्यांनादेखील डायरेक्ट मेसेजिंग करताना समस्या येताना दिसत होती. मात्र आता ही समस्या पूर्णपणे सोडवण्यात आल्याचे ट्विट ट्विटर हेल्पकडून करण्यात आले आहे. मात्र ही घटना म्हणजे एका नव्या सायबर युद्धाची सुरुवात असल्याचे मत अनेक यूजर्स ठामपणे मांडत आहेत. यातील काही यूजर्सनी शेअर केलेले स्क्रीनशॉट बघता अनेक शंका मनात येऊ शकतात. एका यूजरने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये फोटो अल्बम दिसत असून त्यातील एकही फोटो डिस्प्ले होताना दिसत नाही. मात्र त्या ऐवजी या फोटोबद्दलची सर्व माहिती जसे की, या फोटोत कोण कोण आहे, फोटोतील व्यक्ती काय करत आहे, ती हसते आहे का रडते आहे अशी सर्व माहिती वाचायला मिळत आहे. फेसबुकच्या जोडीलाच व्हॉट्सऍप आणि इन्स्टालादेखील अचानक समस्या जाणवू लागल्याने जगभरातच यूजर्समध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हॉट्सऍप आणि इन्स्टाला येत असलेल्या अडचणींची कंपनीला पूर्ण कल्पना असून त्या लवकरच पूर्णपणे सोडवण्यात येतील असे आश्वासन फेसबुकतर्फे देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या