
हुंडा घेणे किंवा देणे ही प्रथा म्हणजे आपल्या समाजाला लागलेली कीड आहे. महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही प्रथा बंद झाली पाहिजे, हा ध्यास घेऊन जालन्यातील भाऊसाहेब भवर हे गेल्या 27 वर्षांपासून सायकलवरून देशभर जनजागृती करतायत. आजवर त्यांनी सहा वेळा देशभ्रमंती केली असून सध्या ते मध्य प्रदेशातील रतलाम येथे पोहोचले आहेत.
भाऊसाहेब भवर हे मूळचे जालन्यातील हसनाबादचे. बहिणीच्या लग्नात हुंडय़ामुळे निर्माण झालेल्या समस्येमुळे लहान वयातच त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. तेव्हापासून ही अनिष्ट प्रथा नष्ट व्हावी, हाच उद्देश त्यांच्या डोळ्यापुढे होता. या प्रथेविरोधात जनजागृती करण्यासाठी त्यांनी आपले घरदार सोडले आहे. आता संपूर्ण देश माझे घर असून देशवासीय माझे कुटुंबीय असल्याचे ते सांगतात. 1993 साली पहिल्यांदा त्यांनी सायकल प्रवासाला सुरुवात केली. गेल्या 27 वर्षांत सहा वेळा सायकलवरून त्यांनी संपूर्ण देश पिंजून काढला आहे.
हुंडय़ाची प्रथा म्हणजे आपल्या समाजाला लागलेला कलंक आहे. काही लोक अगदी शेतजमिनी विपून हुंडा देतात हे चुकीचे आहे हे कुठे तरी थांबले पाहिजे. गुजरात यात्रा पूर्ण करून सध्या मी मध्य प्रदेशात पोहोचलोय. सायकलवरून दिवसाला मी 70 ते 80 किमी अंतर कापतो. वाटेत भेटणाऱया लोकांना माझ्या सायकल रॅलीचा उद्देश समजावून सांगतो. हुंडाप्रथेविरोधातच नाही तर स्त्री भ्रूणहत्या, नशामुक्तीसंदर्भातही मी जनजागृती करतोय.
– भाऊसाहेब भवर
























































