मी काहीही चुकीचे केले नाही सायरस मिस्त्री यांनी सोडले मौन, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर व्यक्त केली नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सायरस मिस्त्री आणि टाटा सन्स यांच्यामध्ये सुरू असलेली न्यायालयीन लढाई नुकतीच संपली. न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर मिस्त्री यांनी नाराजी व्यक्त केली असून टाटा समूहावरदेखील निशाणा साधला. माझ्या कारर्किदीत मी काहीही चुकीचे केलेले नसून मी अगदी निर्धास्तपणे झोपतो, असे स्पष्ट करीत मिस्त्री यांनी टाटा समूहाला अप्रत्यक्ष टोला लगाविला.

सायरस मिस्त्री यांना 2016 साली टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. याविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच सायरस मिस्त्री यांच्याविरोधात निर्णय देऊन हे प्रकरण निकाली काढले. या निर्णयांनतर प्रथमच सायरस मिस्त्री यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली.

यावेळी बोलताना सायरस मिस्त्री म्हणाले की, टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत कंपनीला जागतिक बाजरपेठांमध्ये उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी आत्मविश्वासाने उभी राहण्याची ताकद देण्यासाठी मी प्रयत्न केल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर हिंदुस्थानात एक प्रभावी कायद्याची अंमलबजावणी केली जातेच, पण त्याहून अधिक या ठिकाणी न्यायपूर्ण आणि सामाजिक समानतादेखील असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

त्या संधीबद्दल मी आभारी

दरम्यान, टाटा सन्समध्ये काम करण्यासाठी मिळालेल्या संधीबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी विविध क्षेत्रांतून एकत्र आलेल्या मूल्यांच्या आधारे भिन्न वातावरणात काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी असल्याचे त्यांनी सांगितले. तर टाटा सन्समध्ये पिढ्यानपिढ्या बदल होत असल्याने माझे लक्ष्य एक मजबूत कार्यकारी मंडळ स्थापन करण्यावर होते, असेदेखील त्यांनी यावेळी नमूद केले.
I