तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, धक्का बसलेल्या वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

एका नराधमाने तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करत तिची निर्घृण हत्या केल्याचा संतापजनक प्रकार केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादर-नगर हवेलीतील सिल्वासा येथे घडला. या घटनेचा तिच्या वडिलांना जबरदस्त धक्का बसला आणि त्यांनी फिनाईल घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने परिसरात आरोपीविरोधात तीव्र संताप पसरला आहे.

दादर-नगर हवेलीतील सिलवासा येथे खळबळजनक घटना घडली आहे. या परिसरातील नरौली विस्तार अपार्टमेण्टमध्ये एका कुटुंबातील 3 वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत होती. घराच्या जवळपासच असल्याने घरचे निर्धास्त होते. मात्र बराच वेळ होऊनही ती घरात न आल्याने तिच्या घरच्यांनी आजूबाजूला शोधाशोध सुरू केली. पण तरीही मुलगी भेटली नाही. तीन ते चार तास होऊनही मुलगी न भेटल्याने घाबरलेल्या कुटुंबाने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ त्या मुलीचा शोध सुरू केला.

घराबाहेरच मुलगी खेळत असल्याने पोलिसांनी आजूबाजूचे सगळे फ्लॅट्स तपासले. त्यानंतर पोलिसांनी बाजूला राहत असलेल्या व्यक्तीच्या घरची तपासणी केली पण तिथे काही सापडले नाही. मात्र त्या फ्लॅटच्या बाथरुमच्या खिडकीची काच तुटलेली होती. पोलिसांना त्याच्यावर संशय आला. ते त्या दिशेने अपार्टमेण्टच्या रस्त्यावर गेले असता एक बॅग सापडली. ती बॅग उघडली असता सगळ्यांनाच धक्का बसला. त्या बॅगेत त्या मुलीचा मृतदेह होता. त्या मृतदेहाची तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार करून त्या कोवळ्या देहावर अनेक वार करून तिची निर्घृण हत्या केली होती.

पोलिसांना त्या नराधमाला ताब्यात घेतले. लोकं संतापली होती, ती त्याला मारण्याचा प्रयत्न करत होती. त्याला पोलिसांनी अटक केले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यात आला. मात्र आपल्या कोवळ्या मुलीचा मृतदेह पाहून वडिलांच्या पायाखालची जमिन सरकली होती. त्यांना मानसिक धक्का बसला आणि रात्री त्या पित्याने फिनाईल घेऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी रुग्णालयात नेले मात्र उपचारादरम्यान या पित्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.