
भांडुप येथील ड्रीम्स मॉल दुर्घटना ताजी असतानाच आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला दहिसर येथील जम्बो कोरोना सेंटरमध्ये आग लागली. मात्र वॉर्डबॉय आणि सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून अग्निप्रतिबंधक उपकरणाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असून सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
दहिसर टोल प्लाझा येथील जम्बो कोरोना सेंटर येथे दुपारी हँगर एफमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग जी हँगरपर्यंत पसरली. एफ हँगरमध्ये आग लागली त्या वेळी तेथे 50 रुग्ण तर जी हँगरमध्ये 49 रुग्ण उपचारासाठी दाखल होते. एफ हँगरमध्ये आग लागल्याचे तेथील वॉर्डबॉयला समजल्यानंतर त्याने तत्काळ याची माहिती सुरक्षारक्षकांना दिली. पालिकेचे सुरक्षारक्षक लक्ष्मण लांडगे व इगल सेक्युरिटीचे रवींद्र मतो व इतर इगल सुरक्षारक्षकांनी तेथे असलेल्या अग्निप्रतिबंधक उपकरणाच्या साहाय्याने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच आग विझवत असताना आग लागलेल्या हँगरमधील रुग्ण ताबडतोब सी हँगरमध्ये स्थलांतरित करून वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.






























































