दानवे यांचा चार जिल्ह्यांचा हवाई दौरा १५ मिनिटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी सोमवारी व मंगळवारी मराठवाड्यातील चार जिल्ह्यांचा हवाई दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा अवघ्या १५ मिनिटात घेतला. संघटनात्मक कामाच्या बाबतीत पहिले पाढे पंचावन्न असाच काहीसा अनुभव त्यांना यावेळी आला.

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर खा.रावसाहेब दानवे यांनी सोमवारी सकाळी लातूर, दुपारी नांदेड त्यानंतर हिंगोली व परभणी जिल्ह्याचा दौरा केला. हेलिकॉप्टरने त्यांनी एका दिवसात चार जिल्ह्यांचा दौरा आटोपला. नांदेड येथील शासकीय विश्रामगृहावर पदाधिकारी व कार्यकत्र्यांच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. निवडणुकीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. परंतु पक्षपातळीवर सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र त्यांना पहावयास मिळाले. मागच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी वन बुथ २५ युथ चा कार्यक्रम कार्यकत्र्यांना दिला होता. परंतू या कामात अनेक तालुक्यांमध्ये अपेक्षित असे काम झाले नाही. अनेक ठिकाणी बुथसाठी २५ कार्यकर्ते देखील मिळू शकले नाहीत, अशी परिस्थिती असल्याचे त्यांना दिसले.

नवमतदारांची नोंदणी करण्याच्या बाबतीत देखील कार्यकत्र्यांनी कोणताही उत्साह दाखविला नाही. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी कशी झाली याबाबत जनजागृती करण्याच्या बाबतीतही स्थानिक भाजपचे कार्यकर्ते कमी पडल्याचे सांगण्यात येते. सीएम चषक स्पर्धा आयोजित करण्याच्या कामात नांदेड जिल्हा सर्वात मागे असल्याचे बोलले जाते. एकूणच पक्षपातळीवर सुरु असलेले काम खूपच असमाधानकारक असल्याचे पाहून खा.रावसाहेब दानवे या बैठकीत चांगलेच संतापले होते. पीएगिरी करणाऱ्या एका विस्तारकाला तर त्यांनी मतदार नोंदणी आणि बुथ रचनेच्या कामाविषयी चांगलेच फैलावर घेतल्याचे वृत्त आहे.