
सामना ऑनलाईन । मुंबई
विमान पकडायला उशीर झाला म्हणून एका डान्स कोरिओग्राफरने विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवल्याची घटना समोर आली आहे. मोहित कुमार टांक असं या २५ वर्षीय कोरिओग्राफरचं नाव असून याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित इंडिगो एअरलाईनच्या सकाळी पाचच्या जयपूर-मुंबई या विमानाने मुंबईच्या दिशेने प्रवास करणार होता. मात्र ते विमान पकडण्यास त्याला थोडा उशीर झाला. आपण वेळेवर पोहोचू शकणार नाही हे लक्षात येताच त्याने विमानाच्या उड्डाणाला उशीर होईल या हेतूने एअरलाईनच्या कॉल सेंटरवर कॉल करून विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवली.
एअरलाईनच्या कॉल सेंटरवर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून मुंबईला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. मात्र त्याआधीचे विमानाने उड्डाण केले होते. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेने याबाबत विमानातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. तसेच तातडीने विमानाची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर विमानात बॉम्ब मिळाला नाही आणि ही एक अफवा असल्याचं स्पष्ट झालं.
अफवेनंतर चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीचा तपास करण्यात आला. त्यामध्ये मोहितनेच बनावट कॉल करून अफवा पसरवल्याचं समोर आलं. याप्रकरणी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर याप्रकरणी मोहितला पोलिसांनी अटक केली आहे.
























































