दापोलीत समुद्र किनारपट्टीत 23 घरट्टयांमध्ये 2518 कासवांची अंडी संरक्षित

कोकण किनारपट्टीतील निसर्गरम्य आणि शांत समुद्रकिनाऱ्यावर थंडीच्या शेवटी अन उन्हाळयात अजस्त्र ऑलिव्ह रिडले टर्टल या महाकाय समुद्र कासवांची वीण होते. आजही दुदैवाने या कासवांची आणि त्यांच्या अंडयांची हत्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी केली जाते. या कासवांच्या सुरक्षिततेसाठी वन विभाग दापोली कार्यालयातर्गंत सात गावांमध्ये उभारण्यात आलेल्या 23 घरटयांमध्ये आतापर्यंत 2518 ऑलिव्ह रिडले कासव प्रजातींची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत.

ऑलिव्ह रिडले कासव हे सागरी निसर्ग संतुलनात महत्वाची कामगिरी पार पाडत असते. निसर्ग संतुलनात परिसर स्वच्छतेचे महत्वपूर्ण काम करणारा प्राणी म्हणून कासवांना संबोधले जाते. मृत किंवा आजारी मासे किंवा ईतर जलचर खावून ही कासवे समुद्र सफाईचे महत्वपूर्ण काम करीत असतात. अशी ही कासवाची प्रजाती समुद्र काठाला अंडी घालण्यासाठी येते. कासवांनी घातलेली अंडी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी चोरून नेण्याचे प्रमाण अधिक असल्याने या दुर्मिळ प्रजातीचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाकडून पावले उचलण्यात आली असून समुद्र किनाऱ्यावरील गावात कासव मित्रांच्या सहाय्याने कासवांची अंडी संरक्षित केली जात आहेत.

दापोली तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावरील 7 गावात आतापर्यंत 23 घरटयांमध्ये 2518 कासवांची अंडी संरक्षित करण्यात वन विभागाला यश आले आहे. यामध्ये केळशी येथे 1 घरटे असून 129 अंडी संरक्षित करण्यात आलेली आहेत. आंजर्ले येथे 5 घरटे असून 561 अंडी संरक्षित करण्यात आलेली आहेत. मुरूड येथे 3 घरटयांमध्ये 348 अंडी, कर्दे येथे 1 घरटे 138 अंडी, लाडघर येथे 1 घरटे 108 अंडी कोळथरे येथे 10 घरटयांमध्ये 1016 अंडी तर दाभोळ येथे दोन घरटे असून येथे 218 कासवांची अंडी संरक्षित करण्यात आलेली आहेत. परिक्षेत्र वन अधिकारी दापोलीचे पी.जी.पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दापोलीचे परिमंडळ वन अधिकारी साताप्पा सावंत, बांधतिवरेचे वनरक्षक जी.एम.जलने आणि कोंगळेच्या वनरक्षक एस.डी.गुरव यांच्या अथक प्रयत्न आणि मेहनतीने कासव संवर्धनाच्या कामाने दापोलीत चांगलीच गती घेतली आहे.