दापोली साई रिसॉर्ट प्रकरण; सदानंद कदम यांची उच्च न्यायालयात धाव, याचिकेवर ईडीला नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात व्यावसायिक सदानंद कदम यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी कदम यांच्या याचिकेची गंभीर दखल घेतली आणि प्रतिवादी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस बजावली. ईडीने 29 नोव्हेंबरपर्यंत याचिकेवर उत्तर सादर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

साई रिसॉर्टच्या बांधकामाशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात सदानंद कदम यांना ईडीने मार्चमध्ये अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन नामंजूर केल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई आणि अॅड. प्रेरणा गांधी यांनी जामिनासाठी विनंती करीत न्यायमूर्ती कर्णिक यांच्यापुढे याचिका दाखल केली. याचिकेची दखल घेत न्यायमूर्तींनी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली. याच वेळी ईडीला 29 नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश देत तशी नोटीस बजावली.