वेळवी ग्रामपंचायत निवडणुकीत रणजीत दळवींचा दणदणीत मतांनी विजय, मिंधे गटाच्या उमेदवाराचा दारूण पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेळवी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत रणजित रंजन दळवी यांनी आपल्या प्रतिस्पर्धी मिंधे गटाच्या उमेदवारापेक्षा अधिकची मते घेत दणदणीत विजय मिळून मिंधे गटाच्या उमेदवाराचा दारूण पराभव केला.

दापोली तालुक्यातील वेळवी ग्राम पंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीतील निकालाकडे अखंड तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. कारण वेळवी हे गाव माजी आम. सुर्यकांत दळवी यांचे गाव आहे. त्यामुळे वेळवी गावाला राजकीयदृष्ट्या अधिक महत्व आहे. वेळवी गावचे सुपुत्र असलेल्या माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी दापोली विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार म्हणून तब्बल 25 वर्ष नेतृत्व केले होते. या गावातील रोहीणी दळवी यांनी उपसभापती, सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भुषविले होते. तसेच येथील शांताराम जाधव यांनी समाज कल्याण समितीचे सभापती तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष पदही भुषविले आहे. मधुकर दळवी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून कार्यरत होते. शिवाय ते दापोली तालुका सुपारी उत्पादक संघाचे चेअरमन देखील आहेत त्यामुळे वेळवी या गावाला राजकीयदृष्ट्या अधिक महत्व आहे. त्यामुळे वेळवी ग्राम पंचायतीच्या निवडणुक निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहीलेले होते. त्यात आमदार योगेश कदम समर्थक पुरस्कृत मनोहर दिनकर दळवी हे मिंधे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार होते त्यांचा सहज पाडाव करत रणजीत दळवी यांनी बाजी मारून आपल्या विजयाची मोहर उमठवली आहे.

रणजीत दळवी यांचे वडील रंजन दळवी हेसुध्दा वेळवी ग्राम पंचायती सरपंच राहीलेले आहेत. आता त्यांचे सुपुत्र असलेल्या रणजीत दळवी यांनी वेळवी गावाच्या विकासाचा ध्यास घेत गाव पॅनल म्हणून निवडणूक लढविली. त्यात ते कमालीचे यशस्वी झाले आहेत. यशस्वी नियोजन आणि स्वच्छ कारभार तसेच गावाच्या सर्वांगीण विकासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचे दिलेले वचन हे लोकांनी स्वीकारत मोठ्या फरकाने विजयासाठी वेळवीकरांनी रणजीत दळवी यांच्या पारड्यात मतांचे दान टाकून विजयी करत मिंधे गटाच्या उमेदवाराला सपशेल नाकारत पराभवाची धूळ चारली. रणजीत दळवी यांना निवडणुक निर्णय अधिकारी यांनी विजयी घोषित केल्यानंतर रणजीत दळवींच्या चाहत्यांनी वेळवीतील ग्रामस्थांनी तसेच मित्र परिवाराने विजयाचा आनंद व्यक्त केला.