दखल –  सुंदर शाळा, ‘हसरी शाळा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दत्ता डांगे

सर्वांशीच आपुलकीने, प्रेमळपणाने वागणाऱ्या मितभाषी लेखिका प्रतिभा जगदाळे यांनी मुलांना कवितांची गोडी लागावी म्हणून सुंदर अशी ‘हसरी शाळा’ काढली आहे. ही ‘हसरी शाळा’ चिमणी, मोर, झाडे, मेघ, पाऊस, नदी अशा निसर्गरम्य सान्निध्यात, त्याचबरोबर हुशार आजी, आई, बाबा, दादा, कान्हा, वासुदेव, सुंदर शाळा यांच्या संस्कारात चालते आहे.

आवडतो हा मजला पाऊस, मजा ही चिंब भिजण्याची

झेलत राहू पागोळ्या, गंमत ओंजळ भरण्याची

आपण या पावसात चिंब भिजत आनंदही आपण लुटत असतो. ‘नदीचा थाट’ तर जणू अवर्णनीयच!

पाणी वाहे अखंड खळखळ, छोटे मासे करती सळसळ

इथे लव्हाळा दाट नदीचा, छान देखणा घाट नदीचा

हे आपण वाचत नाही, तर आपण प्रत्यक्षात नदीकाठी लव्हाळ्यात पाय ठेवून गुदगुल्या करणाऱ्या थंड पाण्याचा जिव्हाळा अनुभवत आहोत असेच वाटते. जादूगाराने आपल्या हातातील छडी फिरवून जादू करावी. सर्वांना मोहित करावे तसे प्रतिभाताईंनी आपली लेखणी फिरवून बालकुमारांनाच नव्हे, तर थोरांनाही मोहित केले आहे. या कवितासंग्रहातील बालकवितांचा अंगभूत लोभस गुण खूप महत्त्वाचा वाटला. आईने शाळेला निघालेल्या बालकाच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवावा आणि शाळेला पाठवावं तशा या लोभस, प्रेमळ कविता आहेत! सिद्धहस्त चित्रकार संतोष घोंगडे यांनी मुखपृष्ठात आपली कला मुक्तहस्ते उधळले आहेत. त्यामुळे ही शाळा निसर्गरम्य झाली आहे.

हसरी शाळा

कवयित्री : प्रतिभा जगदाळे 

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे 

मुखपृष्ठ : संतोष घोंगडे 

मूल्य : रु. 170/-