काही घोळ होऊ नये म्हणून माझ्या मृत्युपत्रात नितीन गडकरींचे नाव दिले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो, असं म्हणतात. कोण, कधी, कसा आणि कुठे फिरेल, हे भल्याभल्यांना सांगता येत नाही. हे लक्षात ठेकूनच राजकारणी पावलं टाकत असतात. अशा बेभरंशाच्या वातावरणात मृत्यूपत्रात नाव टाकण्याइतपत एखादा राजकारणी दुसऱ्या राजकारण्याला विश्वासार्ह वाटत असेल तर?…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बाबतीत हे घडलं आहे. विदर्भातील ज्येष्ठ नेते, माजी खासदार दत्ता मेघे यांनी आपल्या मृत्यूपत्रात नितीन गडकरी यांचं नाव नमूद केलं आहे. वर्धा नगरपालिकेच्या कार्यक्रमात सोमवारी गडकरी व मेघे एकत्र होते. ‘माझे सर्व पक्षांशी चांगले संबंध आहेत. नितीनजी आमच्या फॅमिलीचे महत्त्वाचे नेते आहेत. मी माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये म्हणून त्यांचं नाव दिलं आहे,’ असं मेघे यांनी यावेळी सांगितले. मेघे यांनी गडकरी यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केले.

अभियांत्रिकी, वैद्यकीय, नर्सिंग, फिजिओथेरपी व व्यवस्थापन आदी अभ्यासक्रमांसह केजी ते पीजीपर्यंत शिक्षण संस्थांचा वटकृक्ष, वसतीगृहे, सूत गिरण्या, साई अनाथ आश्रमासह मेघे समूहाकडे कोटय़वधी रुपयांची मालमत्ता आहे. सुमारे एक दशकापूर्वी मेघे कुटुंबात कलह उफाळून आला होता. यानंतर नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा टाकण्यात आला. सुमारे 3 वर्षांपूर्वी मेघे यांच्या मृत्यूपत्रात अटलबहादूरसिंग, गिरीश गांधी आणि नितीन गडकरी यांचा उल्लेख होता. दीड वर्षापूर्वी यात सुधारणा करण्यात आली. आता फक्त नितीन गडकरी यांचे नाव आहे. दत्ता मेघे यांचे पुत्र आमदार समीर म्हणाले, गडकरी यांच्याशी असणारे स्नेहबंध यावरून अधोरेखित होतात. कुटुंबात किंवा संस्थांकरून कुठलाही वाद नाही. तथापि, भविष्यात काही समस्या उद्भवू नये, याची काळजी वडिलांनी घेतली असावी.