दावोसमधील गुंतवणुकीवरून मिंधे सरकारमध्ये श्रेयाची लढाई,गुंतवणुकीचे वेगवेगळे आकडे जाहीर

दावोसमधील गुंतवणुकीवरून शिंदे-फडणवीस सरकारमध्येच श्रेयाची लढाई सुरू असल्याचे चित्र आज बघायला मिळाले. दावोसवरून येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळावरच पत्रकार परिषद घेतली. दुसरीकडे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या सर्वांवर मात करीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तर थेट दावोसमधून फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत राज्यात 1 लाख 40 हजार कोटींची गुंतवणूक आणल्याची घोषणा केली.

श्रेयाच्या या लढाईत भाजपचे नेते आमदार आशीष शेलार यांनीही उडी घेतली आणि ट्विट केले. मुख्यमंत्री आणि प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात 1 लाख 37 हजार कोटींची गुंतवणूक आल्याची घोषणा केली, पण आशीष शेलार यांनी दावोसमध्ये दोन दिवसांत महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी 88 हजार  420 कोटींचे करार झाल्याची माहिती दिली. सरकारमधीलच या चार वेगवेगळय़ा नेत्यांकडून दावोस गुंतवणुकीची स्वतंत्रपणे वेगवेगळी माहिती दिली गेली.

राज्यातील उद्योग गुजरातने पळवल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारची नाचक्की झाली आहे. त्यामुळे आता दावोसमधून आम्ही कशी गुंतवणूक आणि उद्योग राज्यात आणले हे दाखविण्यासाठी या सरकारमध्येच श्रेयाची लढाई जुंपल्याचे चित्र आज बघायला मिळाले.

मुख्यमंत्री शिंदे दावोसमधून मुंबई विमानतळावर येताच त्यांनी विमानतळावरच पत्रकार परिषद घेतली आणि गुंतवणुकीची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाने प्रसिद्धीपत्रक जारी करत दावोसमध्ये लाख 37 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याची माहिती दिली.

मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच विधान परिषदेचे माजी  विरोधी पक्षनेते व भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनीही थेट पत्रकार परिषद घेत दावोसमधील गुंतवणुकीची माहिती दिली. एकनाथ शिंदे यांना श्रेय मिळू नये म्हणून प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेतल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती.